लोणावळा, खंडाळ्यात पर्यटकांची गर्दी ; कोरोनाविषयक सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष

पर्यटकांच्या वाहनांमुळे जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग, लोणावळा, खंडाळा आणि भुशी डॅम, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट येथील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. पर्यटकांमुळे लोणावळा, खंडाळ्यासह परिसरातील हॉटेल व खासगी बंगले हाउसफुल्ल झाले आहेत.

    पुणे : गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाउनमुळे घरात बंदिस्त झालेल्या नागरिकांनी निर्बंध शिथिल होताच शनिवारी वर्षाविहार आणि पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनस्थळांकडे मोर्चा वळविला. त्यामुळे लोणावळा, खंडाळ्यासह मावळातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली. मात्र, पर्यटकांकडून कोरोनाविषयक सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले.

    पर्यटकांच्या वाहनांमुळे जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग, लोणावळा, खंडाळा आणि भुशी डॅम, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट येथील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. पर्यटकांमुळे लोणावळा, खंडाळ्यासह परिसरातील हॉटेल व खासगी बंगले हाउसफुल्ल झाले आहेत. सध्या लोणावळा, खंडाळ्यासह मावळात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. अधूनमधून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि मोठ्या सरींमुळे धबधबे ओसंडून वाहत आहेत. धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा मनमुराद आनंद पर्यटकांनी लुटला आहे. शनिवारी बोरघाटात, राजमाची पॉइंट, भुशी धरण, टायगर व लायन्स पॉइंट, तुंगार्ली धरण, नारायणी धाम, एकवीरा देवी मंदिर-कार्ला, भाजे व बेडसे लेणी, लोहगड, विसापूर, राजमाची, तुंग व तिकोना गड; तसेच पवना धरण परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती. मात्र, या वेळी पर्यटकांना सुरक्षित वावराच्या नियमांचा विसर पडल्याचे दिसून आले.

    कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पर्यटक व व्यवसायिकांनी सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन करावे; तसेच मास्कचा वापर करावा.

    - सुरेखा जाधव, नगराध्यक्ष, लोणावळा