मृत्युदर कमी होण्यासाठी सीटी स्कॅन महत्त्वपुर्ण ठरू शकते; अमोल कोल्हे यांचे मत

नारायणगाव : केवळ टेस्टिंगवर अवलंबून राहण्यापेक्षा चेस्ट सिटी स्कॅनचा वापर केल्यास रोगाची गंभीरता लवकर आयडेंटिफाय होऊन त्याचा उपयोग मृत्यूदर कमी होण्यासाठी होऊ शकेल अशी भूमिका शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज दि २६ जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत मांडली.

 नारायणगाव : केवळ टेस्टिंगवर अवलंबून राहण्यापेक्षा चेस्ट सिटी स्कॅनचा वापर केल्यास रोगाची गंभीरता लवकर आयडेंटिफाय होऊन त्याचा उपयोग मृत्यूदर कमी होण्यासाठी होऊ शकेल अशी भूमिका शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज दि २६ जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत मांडली. 

 
खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खा. वंदना चव्हाण,  खा. गिरीश बापट, खा. श्रीरंग बारणे, खा. अमोल कोल्हे यांच्या सह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.
 
या बैठकीत डॉ. कोल्हे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मुद्दे मांडताना अनेक महत्त्वाच्या बाबींकडे सर्वांचेच लक्ष वेधले. विशेष म्हणजे कोरोनावरील फॅबिफ्ल्यू या टॅबलेट संदर्भात जी क्लिनिकल ट्रायल एस्टॅब्लिश करण्यात आली, तसेच प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये अनेक प्रश्नचिन्ह असल्याचे सांगून आपण याविषयी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, आयसीएमआर यांना पत्र पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ फॅबिफ्ल्यूच परिणामकारक आहे असे ठामपणे सांगता येत नाही. त्या गोळीची परिणामकारकता सांगता येत नाही असे असताना केवळ एका दाव्यावर आपण पुढे जाणे धोकादायक असल्याकडे डॉ. कोल्हे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर गोळीच्या किंमतीबाबत बोलताना ते म्हणाले की, फॅबिफ्ल्यूच्या एका गोळीची किंमत १०३ रुपये आहे. याचा अर्थ ग्लेनमार्कचा उपचारासाठी येणारा एका रुग्णाचा खर्च साडेबारा हजार रुपये इतका मोठा आहे. उलट सारखेच कंन्टेन्ट असलेल्या जेनेरिक टॅबलेटचा १० गोळ्यांच्या पॅकचा खर्च फक्त २०० रुपये इतका कमी आहे तर जपानमध्ये उपलब्ध असलेल्या टॅबलेटच्या पॅकची किंमत १६० रुपये आहे. त्यामुळे ग्लेनमार्कचा साडेबारा हजार रूपयांचा १० गोळ्यांचा पॅक आपण किती वापरणार याचाही आपण एकदा विचार करायला हवा असे ठासून सांगितले.
 
विभागीय आयुक्तांनी रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट आपण करतो आहोत. त्यासाठी एक लाख चाचणी किट्सची ऑर्डर दिली असल्याचे सांगितले. त्याबाबत बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले की, या रॅपिड अॅन्टिजेन चाचणीची सेन्सिटिव्हीटी किती याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर खाजगी लॅबला चाचणीची परवानगी आपण दिली आहे. या लॅबची विश्वसनीयता किती, त्याची अचूकता किती याचे विश्लेषण सातत्याने व्हावे. अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे केली. या संदर्भात उदाहरण देताना डॉ. कोल्हे यांनी उरळीकांचनच्या पंचायत समिती सदस्यांबाबत घडलेली घटना सांगितली. ते म्हणाले की, या पंचायत समिती सदस्यांची खासगी लॅबमध्ये तपासणी केली  असता त्यांची चाचणीचे पॉझिटिव्ह अहवाल देण्यात आले. मात्र त्यानंतर शासकीय लॅबमध्ये केलेले चार चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतर परत खासगी लॅबमध्ये केलेल्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अशा घटनांमुळे खासगी लॅबमध्ये संशयित रुग्ण अॅडमीट करण्यासाठी खासगी लॅब पॉजपॉझिटिव्ह अहवाल देतात असा काही जणांचा आक्षेप आहे. त्यामुळे एकूणच संभ्रमाचे वातावरण असल्याचे सांगून डॉ. कोल्हे यांनी खासगी लॅबच्या विश्वासार्हतेकडे लक्ष देण्याची मागणी केली. 
 
याचबरोबर पुढच्या काळात कशा पद्धतीने प्रोग्रेशन दिसेल. गेल्या काही दिवसांत व्हायरसच्या ट्रेंडमध्ये काही बदल झाला आहे का? अशा काही बाबींचे निरीक्षण केले तर आपण या गोष्टीला किती घाबरायचे हेही विचारात घेता येईल. त्यामुळे त्याचे अॅनालिसीस व्हावे असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. तर डबलिंग रेटबाबत बोलताना ते म्हणाले की, कन्फर्मेशन ऑफ केसेस आणि डबलिंग रेट यांचे जर कोऑर्डिनेशन केले तर आपल्याला कम्युनिटी स्प्रेड किती आहे याचा निश्चित अंदाज येईल. त्याचबरोबर फ्रंटलाईनर्सची ठराविक काळाने तपासणी केली पाहिजे अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी या बैठकीत केली. 
आजच्या बैठकीत डॉ. कोल्हे यांनी मांडलेल्या अतिशय अभ्यासपूर्ण व समर्पक मुद्द्यांना सर्वांनीच चांगला प्रतिसाद दिला.