शाळांच्या फीमध्ये ५० टक्के कपात करा ; विविध संघटना काढणार उद्या मोर्चा

अ‍ॅड.मंदार जोशी म्हणाले, शिक्षणसंस्थांना कायद्याची भिती राहिली नाही. सरकारने सवलत दिली असली तरी प्रत्यक्षात शाळांची परिस्थिती वेगळी आहे. शिक्षणसंस्था नफेखोरीसाठी आहेत का ? पालकांना फीसाठी तगादा लावणाऱ्या शिक्षणसंस्थाविरोधात फौजदारी कारवाई करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

    पुणे : कोरोनामुळे रोजगार गेला असतानाही शाळांनी पूर्ण फी भरण्याचा पालकांना तगादा लावला आहे. फी न भरल्यास ऑनलाईन शाळेत सहभागी केले जाणार नसल्याचे शाळांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे यंदा शाळांच्या फीमध्ये ५० टक्के कपात करावी या मागणीसाठी विविध पक्ष, संघटनांतर्फे मंगळवारी (दि.६) पुणे स्टेशन येथील शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

    कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला असून कुटूंबांचा उदरनिर्वाह करणे मुश्किल झाले आहे. तर शाळांमध्ये यंदा कल्चरल अ‍ॅक्टिव्हिटी, स्पोर्टस अ‍ॅक्टिव्हिटी, मुलांना शाळेत देण्यात येणारे डब्बे या कोणत्याच गोष्टी झालेल्या नाहीत. मा त्याचे पैसे पालकांनी का द्यावे? जर पालकांनी फी भरली नाही, तर शिक्षण संस्था व शाळा ऑनलाइन शिक्षण बंद करीत आहेत व त्यांना रिझल्ट न देणे, वह्या पुस्तके दिली जाणार नाही अशा प्रकारचे फोन सतत शिक्षण संस्था पालकांना करत आहेत. त्यामुळे यंदा शैक्षणिक फी ५० टक्क्यांनी कमी करावी यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता महात्मापुâले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून ते शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ आणि संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आठवले गट राष्ट्रीय निमंत्रक अ‍ॅड.मंदार जोशी, राष्ट्रवादीचे प्रशांत गांधी, महाराष्ट्र नागरी कृती समितीचे सुरैश जैन आदी उपस्थित होते.

    अ‍ॅड.मंदार जोशी म्हणाले, शिक्षणसंस्थांना कायद्याची भिती राहिली नाही. सरकारने सवलत दिली असली तरी प्रत्यक्षात शाळांची परिस्थिती वेगळी आहे. शिक्षणसंस्था नफेखोरीसाठी आहेत का ? पालकांना फीसाठी तगादा लावणाऱ्या शिक्षणसंस्थाविरोधात फौजदारी कारवाई करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.