‘स्मार्ट सिटी’वर सायबर हल्ला; हल्लेखोरांकडून बिटकॉइनची मागणी

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या तब्बल २७ सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सर्व्हरमधील डेटा इनस्क्रिप्ट करून सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. यासह डेटा पूर्वपदावर आणण्यासाठी बिटकॉइनची खंडणी मागितल्याचेही पोलिसांनी सांगितले.

    पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या तब्बल २७ सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सर्व्हरमधील डेटा इनस्क्रिप्ट करून सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. यासह डेटा पूर्वपदावर आणण्यासाठी बिटकॉइनची खंडणी मागितल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून१०० कोटींपेक्षा जास्त खर्च करून विकास प्रकल्प राबविणारी स्मार्ट सिटी ही संस्था नागरिक आणि प्रकल्पासंदर्भातील गोपनीय माहितीही सुरक्षित ठेऊ शकत नाही का? असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.

    या प्रकरणी टेक महिंद्राचे प्रोग्राम मॅनेजर महेंद्र लाठी यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञाता विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सायबर विभागाकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २६ फेब्रुवारी२०२१ रोजी घडला आणि या प्रकरणी मंगळवारी तक्रार देण्यात आली त्यानंतर घटना उजेडात आली. पण एवढे दिवस ही माहिती का लपवून ठेवण्यात आली या बाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. या सर्व प्रकारात तब्बल ५ कोटींचे नुकसान झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नेमका कोणता आणि किती महत्वाचा डेटा इन्क्रीप्ट केला गेला याची पूर्णतः माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे. तसेच हा डेटा पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी अज्ञातांकडून बिटकॉइनची खंडणी मागितल्याचे पिंपरी-चिंचवड सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तुंगार यांनी सांगितले.

    ५ कोटींचे नुकसान
    या प्रकरणी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अधिकारी नीलकंठ पोमण यांना विचारले असता या घटनेशी महापालिकेचा काहीही संबध नाही, तक्रार देणाऱ्या संबंधित संस्थेकडे डेटा इन्स्टॉलेशनच ठेका आहे, तेच काम करत असताना हा सायबर हल्ला झाला असल्याची माहिती मिळाल्याचे पोमण म्हणाले. इन्क्रीप्ट झालेला डेटाही महत्वपूर्ण नसल्याचा दावा पोमण यांनी केला आहे. तर या घटनेत ५ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचे टेक महिंद्राने स्पष्ट केले आहे.