मुंबई-पुणे आणि नाशिकला पाण्याचा पुरवठा करणारी धरणं ओव्हरफ्लो

णे, मुंबई आणि नाशिकच्या धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस सुरु आहे. पोषक वातावरणामुळे राज्यात पुढील दोन दिवस सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई-पुणे आणि नाशिकला पाण्याचा पुरवठा करणारी धरणं भरली आहेत.

  पुणे : पुणे, मुंबई आणि नाशिकच्या धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस सुरु आहे. पोषक वातावरणामुळे राज्यात पुढील दोन दिवस सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई-पुणे आणि नाशिकला पाण्याचा पुरवठा करणारी धरणं भरली आहेत. गणरायाच्या अगमानानंतर पावासाच जोर वाढला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस राहणार आहे.

  दरम्यान या सततच्या पावसाने मुंबईकर, पुणेकर, नाशिकरांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटवली आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणं शंभर टक्के भरली आहेत. तर भातसा ,कोयना आणि भंडारदरा यासारखी महत्वाची धरणंही ओव्हरफ्लो झाली आहेत.

  कोणकोणते धरण भरले आहेत?

  खडकवासला धरण साखळीतील टेमघरसह सर्व धरणे १०० टक्के भरली आहेत. चारही धरणे एकाच वेळी पहिल्यांदा १०० टक्के भरली आहेत. परिणामी खडकवासला धरणातील विसर्ग रात्री नऊ वाजता सहा हजार ८४८ क्यूसेक करण्यात आला आहे. टेमघर रात्री दहा वाजता १०० टक्के झाले. धरणांची १००टक्के पातळी कायम ठेवून, पावसाचे येणारे पाणी नदीत सोडून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार, मुठानदी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी विजय पाटील यांनी दिल्या आहेत.

  सोमवार व मंगळवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार धरणं पूर्ण भरली आहेत. पानशेत, वरसगाव, भाटघर, टेमघर आणि खडकवासला ही पुण्यातील सर्व धरणं शंभर टक्के भरली आहेत. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने (ता.१३) सकाळी धरण भरले असून जलसंपदा विभागाने स्पिलवेचे गेट उघडून २४३६ व वीज केंद्रातून ८३० क्यूसेसने पाणी सोडण्यास सुरवात केली आहे. गंगापूर धरणातून सकाळी 9 वाजता एकूण २५०० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने या धरणातून 800 क्यूसेक्स विसर्ग आठ वाजता सोडण्यात आला.

  निफाडच्या नांदूरमध्यमेश्वर धरणातून १६ हजार ५८२ पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. भंडारदरा जलाशय भरल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रतनवाडी, पांजरे, घाटघर, भंडारदरा, वाकी, परिसरात सलग दोन दिवस पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले.

  गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे बारवी धरणापाठोपाठ भातसा धरणही ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्याची पाण्याची चिंता मिटली असल्याचं सांगितलं जात आहे. धरणाचे पाचही दरवाजे अडीच सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून 190.89 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणं सरासरी 96 टक्के भरली आहेत. पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढल्यास ही धरणं शंभर टक्के भरतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.