५ जुलैपासून दंडकारण्य अभियानास सुरूवात

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती अहमदनगर: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी सहकारमहर्षी स्व.भाऊसाहेब थोरात यांनी सुरु केलेले दंडकारण्य अभियान ही मोठी लोकचळवळ

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

अहमदनगर:  पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी सहकारमहर्षी स्व.भाऊसाहेब थोरात यांनी सुरु केलेले दंडकारण्य अभियान ही मोठी लोकचळवळ झाली आहे. सध्या असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे व पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे मुलभूत कर्तव्य ठरले असून यावर्षी १५ व्या दंडकारण्य अभियानाचा प्रारंभ शिबलापूर येथून(दि.५) ५ जुलै रोजी होणार असल्याचे प्रतिपादन दंडकारण्य अभियानाचे मार्गदर्शक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कला,वाणिय व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात सोशल डिस्टंन्सचे पालन करुन झालेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे होते तर व्यासपीठावर बाजीराव पा.खेमनर,प्रकल्पप्रमुख दुर्गा तांबे,कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, लक्ष्मणराव कुटे, प्रा.बाबा खरात, कृषी अधिकारी सुधाकर बोरोळे,प्रशांत शेंडे,कारखान्याचे कार्य कारी संचालक जगन्नाथ घुगरकर,दुध संघाचे कार्यकारी संचालक डॉ.प्रतापराव उबाळे,प्रा.व्ही.बी.धुमाळ,शेतकी संघाचे मॅनेजर अनिल थोरात, शॅम्प्रोचे मॅनेजर जगन्नाथ गोडगे,रजिस्ट्रार आचार्य बाबुराव गवांदे, डॉ.दिनानाथ पाटील, बाळासाहेब उंबरकर,वन विभागाचे आखाडे,माळी,पारेकर,सामाजिक वनीकरणाचे दुराशिस,रमेश थोरात,मंगेश सांगळे आदिसंह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मागील कामकाजाचा आढावाही घेण्यात आला.

थोरात म्हणाले की,सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दुरदृष्टीतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानाची नोंद युनोने घेतली आहे.मागील १४ वर्षात तालुक्यातील विविध संस्था, विद्यालये,कार्यकर्ते,नागरिकां च्या सहकार्यातून हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. तालुक्यात कमी पाऊस,जास्त उन्हाळा असून ही सहकारी संस्थांनी दिलेल्या भागामध्ये वृक्षसंवर्धनाचे चांगले काम केले आहे. यावर्षी कोरोनाचे संकट आले आहे.या काळात सोशल डिस्टन्स पाळून कोरोनाची साखळी तोडणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोना व प्रदुषण या दोन संकटांना हटविण्यासाठी पर्यावरण समतोल महत्वाचा ठरणार आहे. वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.या दंडकारण्य काळात सोशल डिस्टन्सचे पालन करुन प्रचार व प्रसार बिजारोपण,वृक्षारोपण अशा तीन टप्यात काम केले जाणार आहे.या अभियानात काम करतांना चांगल्या जागा निवडून योग्य वृक्षांच्या रोपना बरोबर प्रत्येकाने आपल्या घराच्या परीसरात नारळ,लिंबू, जांभूळ, शेवगा, आंबा, चिंच अशी बहुउपयोगी वृक्ष लागवड करावी. तालुक्यातील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपनाबरोबर घाटांमध्ये विविध रंगीबिरंगेरंगी फुलांचे रोपन करावे.वृक्ष लाग वड करुन वृक्षारोपन व संवर्धन ही काळाची गरज असल्याने तालुक्यातील परीसर हिरवागार होण्यासाठी दंडकारण्य अभियानात अबाल वृध्दांसह सर्वांनी सक्रीय सहभागी व्हावे असे अवाहनही त्यांनी यावेळी केले.

डॉ. तांबे म्हणाले की, दंडकारण्य अभियान ही संगमनेर तालुक्याची वेगळी ओळख असून पर्यावरण संवर्धनाचे काम सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. वृक्ष वाढविणे गरजेचे असल्याने शासनाच्या वतीने ही अनेक योजना राबविण्यात येत आहे. वृक्षसंवर्धनाचे महत्व विद्यार्थी,नागरिक, महिला या सर्वांना कळले असून या कामाची प्रत्येकाने कायम अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब उंबरकर यांनी केले. प्रा.बाबा खरात यांनी आभार मानले.