जिल्ह्यातील  २३ गावांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका

आतापर्यंत अवघ्या आठ गावांमध्येच सुरक्षेच्या दृष्टीने कामे पुणे : जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे २०१४मध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतरही गेल्या सहा वर्षांत प्रशासनाला जाग आलेली नाही.

आतापर्यंत अवघ्या आठ गावांमध्येच सुरक्षेच्या दृष्टीने कामे
पुणे :
जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे २०१४मध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतरही गेल्या सहा वर्षांत प्रशासनाला जाग आलेली नाही. जिल्ह्यामधील दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या २३ गावांपैकी आतापर्यंत अवघ्या आठ गावांमध्येच सुरक्षेच्या दृष्टीने कामे झाली आहेत. १५ दरडप्रवण गावे अद्याप मृत्यूच्या छायेत असून, या गावांवरील धोका टाळण्यासाठी राज्य सरकारने सुमारे ३५ कोटी रुपयांचा निधी देऊनही ठोस कामे न झाल्याने येत्या पावसाळ्यात या गावांवरील धोका कायम राहिला आहे.

आंबेगाव तालुक्यातील माळीण या गावात ३० जुलै २०१४ रोजी दरड कोसळून १५१ जणांचा बळी गेला होता. या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण केले. डोंगर उतारावरील गावे आणि वाड्या यांचे सर्वेक्षण केल्यावर ९५ ठिकाणे ती धोकायदायक असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या ठिकाणांची भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागांकडून पाहणी करण्यात आली. त्यानुसार २३ गावांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने धोकादायक असलेल्या गावांमध्ये सुरक्षेचे उपाय सुचविले. त्यानुसार या गावांमध्ये विविध कामे करण्यात येत आहेत. मात्र, त्यामुळे २३ पैकी अवघ्या आठ गावांवरील धोका टळला आहे. उर्वरित गावे अजूनही धोकादायक स्थितीतच असल्याचे निदर्शनास आले आहे.

या गावांवरील धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे निधीची मागणी केली होती. राज्य सरकारने या गावांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कामे करण्यासाठी सुमारे ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातून मुळशी तालुक्यातील घुटके, भोर तालुक्यामधील धानवली खालची, जांभूळवाडी (कोर्ले), डेहेणे, पांगरी आणि सोनारवाडी; तसेच वेल्हा तालुक्यामधील आंबवणे आणि घोल या गावांतील कामे झाली असल्याने या त्यांच्यावरील धोका टळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

-सात गावे पुनर्वसनापासून वंचितच
आंबेगाव तालुक्यातील फुलवडेअंतर्गत भगतवाडी, माळीणअंतर्गत पसारवाडी, आसणे, जांभोरीअंतर्गत काळेवाडी क्रमांक एक आणि दोन, बेंडारवाडी ही पाच गावे माळीणपासून जवळच आहेत. खेड तालुक्यातील भोमाळे आणि भोरगिरी पदरवस्ती ही दोन गावे धोकादायक स्थितीत आहेत. या गावांमध्ये सुरक्षिततेबाबतची कामे केली, तरी धोका कायमचा टळणार नसल्याने या गावांतील नागरिकांकडून पुनर्वसनाची मागणी करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी दोन्ही तालुक्यांच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

-कोणती कामे सुरू?

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने सुचविलेल्या कामांनुसार काही गावांमध्ये कामे सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही कामे करण्यात येत आहेत. त्यामध्ये डोंगर उतारावर चर काढणे, धोकादायक असलेले डोंगरकडे तोडणे, बांबूच्या झाडांची लागवड करणे आदी प्रकारच्या कामांचा समावेश आहे. मात्र, ही कामे १५ गावांमध्ये पूर्ण क्षमतेने होऊ शकली नसल्याने या गावांवरील धोका कायम आहे.

-दहा लाखांचा निधी मंजूर
धोकादायक गावांमध्ये कामे करण्यासाठी मिळालेला सुमारे ३५ कोटी रुपयांचा निधी खर्च करता आला नसतानाच, आता राज्य सरकारने पावसाळ्याच्या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना, शोध मोहीम आणि बचाव कार्याशी संबंधित साहित्य खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. हा निधी शोध आणि बचाव साहित्य खरेदी, संरचनात्मक कामे आणि जनजागृती करण्यासाठी खर्च करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. हा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

-धोका असलेली गावे
– आंबेगाव : फुलवडेअंतर्गत भगतवाडी, माळीणअंतर्गत पसारवाडी, आसणे, जांभोरीअंतर्गत काळेवाडी क्रमांक एक आणि दोन, बेंडारवाडी
– खेड : भोमाळे, भोरगिरी पदरवस्ती
– जुन्नर : निमगिरीअंतर्गत तळमाची वाडी
– मावळ : भुशी, माळवाडी, मोरमाची वाडी, गबाळे वस्ती, लोहगड, ताजे, बोरज, तुंग,

-कामे झालेली गावे

वेल्हा : आंबवणे, घोल
मुळशी : घुटके
भोर : धानवली खालची, जांभूळवाडी (कोर्ले), डेहेणे, पांगरी, सोनारवाडी