विद्यार्थ्यांच्या फेलोशिपबाबत लवकरच निर्णय ; बार्टीच्या महासंचालकांची माहिती

-नियामक मंडळाच्या बैठकीत होणार चर्चा

  पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) एका निकषामुळे अनुसूचित जातीतील पीएच.डी.चे संशोधक विद्यार्थी अधिछात्रवृत्तीपासून (फेलोशिप) वंचित आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, याबाबत आगामी नियामक मंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असून, अधिछात्रवृत्तीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी स्पष्ट केले आहे.

  बार्टीच्या माध्यमातून २०१३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग , मान्यताप्राप्त विद्यापीठ, संस्था, महाविद्यालयातून नियमित आणि पूर्णवेळ पीएच.डी. व एम.फिल. करणाऱ्या महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जात होता. बार्टीने २०१९ या वर्षासाठी अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज मागविले होते. मात्र, एका निकषामुळे कृषी विद्यापीठात पीएच.डी. करणारे विद्यार्थी अधिछात्रवृत्तीस अपात्र ठरविण्यात आले होते.

  मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) ने २०१९ करिता जाहीर केलेल्या देशातील पहिल्या १०० विद्यापीठातील नोंदणीकृत असावा, असा निकष लावण्यात आला होता. त्यामुळे कृषी विद्यापीठातून पीएच.डी. करणारे विद्यार्थी अपात्र ठरत होते. मात्र, त्यांना देखील या अधिछात्रवृत्तीचा लाभ मिळावा अशी बार्टीची भूमिका आहे. त्यामुळे नियामक मंडळाची मान्यता घेऊन याबाबतचा निकष बदलून कृषी विद्यापीठांतर्गत पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ देण्याबाबत बार्टी सकारात्मक असल्याचे गजभिये यांनी म्हटले आहे.

  याबाबत विद्यार्थ्यांकडूनही पाठपुरावा केला जात होता. मात्र, कोरोना महामारीमुळे याबाबत बैठक हाेण्यास विलंब झाला, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, एनआयआरएफ रँकिंग असलेल्या टॉप १०० विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता ३० व्या नियामक मंडळाच्या (बीआेजी ) बैठकीत यावर साकल्याने चर्चा हाेऊन निर्णय घेण्याबाबत आम्ही सकारात्मक असल्याचे महासंचालक गजभिये यांनी स्पष्ट केले आहे.

  एनआयआरएफ रँकिंग असलेल्या टॉप शंभर विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि आता होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा हाेणार आहे. त्यात यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

  - धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी