अनधिकृत होर्डींग्जच्या सर्वेक्षण व हटविण्यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्याचा निर्णय

महापालिका परिसरातील अनधिकृत होर्डींग्ज जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून फलक स्ट्रक्चरसह या होर्डींग्ज हटविण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र एजन्सीकडे हे काम देण्यात येणार आहे. या एजन्सी स्वखर्चाने स्ट्रक्चर काढणार असून काढण्यात आलेल्या अनधिकृत होर्डींग्ज स्ट्रक्चरच्या ८० टक्के भागाच्या विक्रीची रक्कम महापालिकेला मिळणार आहे.

    पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील अनधिकृत होर्डींग्ज जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून फलक स्ट्रक्चरसह या होर्डींग्ज हटविण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र एजन्सीकडे हे काम देण्यात येणार आहे. या एजन्सी स्वखर्चाने स्ट्रक्चर काढणार असून काढण्यात आलेल्या अनधिकृत होर्डींग्ज स्ट्रक्चरच्या ८० टक्के भागाच्या विक्रीची रक्कम महापालिकेला मिळणार आहे. या विषयास स्थायी समितीने मंजूरी दिली.

    याविषयासह महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या खर्चासह अवलोकनाचे विषय आणि विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे ३५ कोटी ५१ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची विशेष सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.

    केएसबी चौक ते देहु आळंदी रस्त्यापर्यंतच्या रस्त्याचे पॅचवर्क पध्दतीने डांबरीकरण करणे आणि स्थापत्य विषयक दुरुस्तीची कामे करण्यासाठी १ कोटी ४० लाख रुपये खर्च होणार आहेत. प्रभाग क्र.१८ मधील गांधी पेठ, चिंचवड व इतर परिसरातील जलनिःसारण विषयक सुधारणा कामे करणे आणि उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्याकामी २५ लाख रुपये खर्च होणार आहेत. नाशिक फाटा ते वाकड या ४५ मीटर बीआरटीएस रस्त्याचे डांबरीकरण करण्याकामी १ कोटी ४० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या खर्चासही स्थायी समितीने मान्यता दिली.