एचए कंपनीत लस निर्मितीसाठी निर्णय लवकरच : मनसुख मांडवीय

    पिंपरी : हिंदुस्तान एंटीबायोटिक लिमिटेड (एचए) कंपनीत कोरोना प्रतिबंधक लस निर्मिती करण्याबाबत केंद्र सरकारची भूमिका सकारात्मक आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा पाठपुरावा कंपनी व्यवस्थापनाने केला आहे. लवकरच लस निर्मितीसाठी निर्णय घेण्यात येईल. त्यासोबतच एचए कंपनीला गतवैभव प्राप्त करुन देण्याबाबत सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत, अशी भूमिका केंद्रीय रसायन व औषधी निर्माण राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी मांडली.

    केंद्रीय रसायन व औषधी निर्माण राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी एचए कंपनीला भेट दिली. यावेळी एचए कामगार संघटनेचे अध्यक्ष खासदार मनोज कोटक, कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक निरजा सराफ आदी उपस्थित होते. यावेळी आमदार लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडमधील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीमध्ये प्रस्तावित कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीला केंद्र सरकारने चालना द्यावी. त्याचा पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवडला फायदा होईल, अशी मागणी करणारे निवेदन मांडवीय यांना निवेदन दिले.

    निवेदनात म्हटले आहे की, कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीकरीता हिंदुस्थान अँटिबायोटिक (एचए) कंपनीला पिंपरी-चिंचवड महापालिका 25 कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. त्याबाबत महासभेत आणि स्थायी समिती सभेत प्रस्ताव मंजूरही केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लस निर्मितीसाठी परवानगी द्यावी. पुणे येथे त्याअनुशंगाने बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी कंपनीच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार मनोज कोटक, कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक निरजा सराफ उपस्थित होत्या. ही बैठक सकारात्मक झाली होती. कंपनी व्यवस्थापन आता केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहे.

    पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रात लसीकरण उपलब्धते अभावी बंद करावे लागते. पुरेसा साठा नसल्यामुळे लसीकरण केंद्रासमोर रांगा दिसतात. यामुळे हिंदुस्थान अँटिबायोटिक (एचए) कंपनीत लस निर्मिती होणे नागरिकांच्या हिताचे आहे. यासह रेमडीसेवीर इंजेक्शन, ब्लॅक फंगस वरील उपचारासाठी अँफोटेरिसीन-बी इंजेक्शनही कंपनीत निर्माण करण्यात येणार आहे. त्याचा लाभ पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि प्रामुख्याने पिंपरी- चिंचवडला होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत सकारात्मक विचार करुन लसनिर्मितीसाठी आवश्यक परवानी तात्काळ द्यावी, असेही आमदार लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे.