शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे मुख्यंमत्री; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा आढळराव पाटील यांना टाेला

  राजगुरुनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वरदहस्त डोक्यावर म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, याचा विचार श्रेयासाठी धडपड करणाऱ्यांनी करावा. माजी खासदारांना काही काम नसल्यामुळे वाद, भांडणे लावण्याचे व श्रेय घेण्याचे काम ते करित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा डोक्यावर हात आहे म्हणून महाविकास आघाडी सरकार आहे, असा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिला.

  पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळणालगत असलेल्या खेड घाट रस्त्याचा लोकार्पण सोहळा खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत जेष्ठ नागरिकाच्या हस्ते शनिवारी (दि. १७)  झाले. यावेळी खासदार कोल्हे व आमदार मोहिते यांनी चौफेर राजकीय टोलेबाजी केली. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पूर्वसंध्येला केलेल्या उद्घाटन कार्यक्रमामुळे या समारंभाकडे उत्तर पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्री, माजी खासदार यांचे फोटो व नसल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्त्य संतप्त झाले होते. माजी खासदार आढळराव शिवसेनेचे कार्यकर्त्यासह येऊन शुक्रवारी खेड व नारायणगाव रस्त्याचे उद्घाटन केले होते. यावरून खासदार डॉ. कोल्हे  उद्घाटनप्रसंगी टीका केली.

  याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, प्रकल्प समन्वयक दिलीप मेदगे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विनायक घुमटकर, पुणे जिल्हा बँकेचे संचालक संजय काळे यांच्यासह अरुण चांभारे, रामदास ठाकूर, अनिल राक्षे, संध्या जाधव, कैलास लिंभोरे, मनिषा सांडभोर, अॅड. मनिषा टाकळकर, अजय भागवत, सुभाष होले, मयूर मोहिते, उमेश गाडे, तेजस झोडगे, प्रमुख पदाधिकारी, तुकाईवाडी सरपंच कुसुम भांबुरे, रोडवेज सोल्युशन कंपनीची व्यवस्थापक संतोष घोलप, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, दिलीप मेदगे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन उमेश गाडे यांनी करून आभार व्यक्त केले.

  कार्यारंभ आदेश माझ्या कार्यकाळातील

  यावेळी खासदार डॉ. कोल्हे यांनी या प्रकल्पाचा इतिहास उलगडून सांगितला. या कामाचे खरे श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे आहे. कर्तव्यभावनेतून पाठपुरावा करणे हे लोकप्रतिनिधीचे काम असते. यात श्रेयवाद आणायचा नसतो, असे त्यांनी माजी खासदारांना सुनावले. खासदार संजय राऊत यांना देखिल चुकीचे ब्रिफिंग केल्याने खेडचा वाद राज्यस्तरापर्यंत पोहोचला. कालचा कार्यक्रम म्हणजे बालिशपणा होता. या घाटाचा कार्यारंभ आदेश माझ्या कार्यकाळातील आहे. निवडणूक संपली की राजकारण संपायला पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

  रिंगरोडसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

  पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पा दरम्यान असणाऱ्या सर्व आमदारांची बैठक घेऊन, सर्व अडचणी समजून घेऊन त्याला अजित पवार यांनी मंजुरी दिली.  रिंगरोडसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे कोल्हे यांनी यावेळी सांगितले. पुणे नाशिक महामार्ग विस्तारीकरण करण्यासाठी ६५० कोटी व तळेगाव – शिक्रापूर या प्रस्तावित महामार्गासाठी ६०० कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती कोल्हे यांनी दिली. या चौकात रबलिंग स्ट्रीप लावून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश त्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना दिले.

  आढळरावांनी किती निधी आणला ?

  आमदार दिलीप मोहिते पाटील  म्हणाले, आढळराव हे आंबेगाव तालुक्यातील कामांना अजिबात विरोध करत नसून विरोध फक्त खेड तालुक्यातील कामांना करतात, असा आरोप त्यांनी केला. आढळराव यांचे जिवाभावाचे सहकारी राम गावडे, गणेश सांडभोर, अमृता गुरव हे त्यांना का सोडून गेले ? मुख्यमंत्री शिवसेनेचा असून आढळराव यांनी खेड, शिरूर, आंबेगाव व जुन्नर या तालुक्यांसाठी कित्ती निधी आणला ? किती वेळा ते मुख्यमंत्री यांना भेटले ? असा जाहीर सवाल मोहिते यांनी केला.

  कोल्हे यांचे आढळराव यांना जाहीर प्रश्न

  अडीच किलोमीटरचा खेड घाट बायपास रस्ता ४ किलोमीटर कसा झाला ? पठारावरील ९६ एकर जागेचे महत्व वाढविण्यासाठी हा खटाटोप आहे का ? कुणाची शाळा वाचवण्यासाठी त्यांनी रस्ता मार्ग बदलला ? १५ वर्षांपासून चाकणची वाहतूक कोंडी का सोडवली नाही ? खेडचे विमानतळ कुणामुळे गेलं ? पुणे नाशिक रेल्वेचा डीपीआर एकदाही राज्य शासनापुढे का सादर केला नाही ? बैलगाडी शर्यत का नाही चालू झाली ? शिवसंपर्क अभियान पक्षवाढीसाठी आहे की आमच्यावर टीका करण्यासाठी आहे ?