तुकाराम बीज काळात देहूत जमावबंदी ; कोरोनामुळे देहूरोड पोलिसांचा निर्णय

बीज सोहळयासाठी सरकारच्या आदेशानुसार केवळ ५० लोकांना पास देणार आहोत. पास तपासूनच लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे. गावात २९ मार्चला अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे ३० मार्च रोजी बीज आहे.सार्वजनिक गाथा पारायण सोहळयासाठी परवानगी कोणालाही दिलेली नाही.

    पिंपरी : संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत २९ आणि ३० मार्च या दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहे. श्रीखेत्र देहूगावात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. कोरोनामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार केवळ ५० जणांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज बीज सोहळा होणार आहे, अशी माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास सोंडे यांनी दिली.

    येत्या ३० मार्च रोजी बीज सोहळा आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर देहूत बीज सोहळयासाठी केवळ ५० जणांच्या उपस्थितीत साजरी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. तसेच स्थानिक पोलीसांना यासाठी नियोजन करण्यास सांगितले आहे. या पाश्र्वभूमीवर संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या वतीने नियोजनासंबंधी बैठक घेण्यात आली. संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, माजी विश्वस्त अशोक महाराज मोरे आणि इतर उपस्थित होते.

    पोलीस निरीक्षक विलास सोंडे म्हणाले, बीज सोहळयासाठी सरकारच्या आदेशानुसार केवळ ५० लोकांना पास देणार आहोत. पास तपासूनच लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे. गावात २९ मार्चला अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे ३० मार्च रोजी बीज आहे.सार्वजनिक गाथा पारायण सोहळयासाठी परवानगी कोणालाही दिलेली नाही.

    '' राज्य सरकारच्या आदेशानुसार ५० जणांच्या उपस्थितीत बीज सोहळयाच्या कार्यक्रम होणार आहे. आम्ही सरकारला संपूर्ण सहकार्य करणार आहोत. बंडातात्या कराडकर त्यांच्या पध्दतीने बीज सोहळा पार पाडण्याचे ठरवतील. आम्ही राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार बीज सोहळा करणार आहोत.''

    - मधुकर महाराज मोरे (अध्यक्ष, संत तुकाराम महाराज संस्थान)