दलित वस्ती सुधार योजनेतून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

कर्जत : कर्जत तालुक्यातील मलठण येथील दलित वस्ती सुधार योजनेतून चालू असलेले व चार पुर्ण झालेले सिमेंट रस्ता काम  अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्याची चौकशी  करून  ग्रामसेवक केसकर व शाखा अभियंता फुलारी यांच्यावर कारवाई करावी,  अशी मागणी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की, मलठण येथील दलित वस्तीत दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत चार रस्ते सिमेंट काँक्रीट मध्ये पूर्ण करण्यात आले आहेत. या रस्ता कामात खाली मातीचा भराव करून सिमेंट काँक्रीट टाकले आहे. या रस्ता कामात पाईप टाकले आहेत. त्या पाईप च्या खाली काँक्रीट टाकलेले नाही तर कोणत्याही रस्त्याच्या साईट पट्या भरलेल्या नाहीत. त्यामुळे हे रस्ते टिकाऊ नसल्याने या झालेल्या कामाची वरिष्ठ अधिकारी याच्या कडून चौकशी करून ग्रामसेवक केसकर व शाखा अभियंता फुलारी याची चौकशी करून त्याच्या वर कारवाई करण्यात यावी. या निवेदनावर बबन पवार, सोमनाथ पवार, माजी सरपंच पोपट वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते सतिष वाघमारे याच्या सहया आहेत. 

रस्ता दुसरीकडे बांधण्यात आल्याची तक्रार 

मलठण येथील दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत चालू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात मातीचा भराव करून काँक्रीट टाकण्याची तक्रार येथील दलित कार्यकर्ते बबन पवार यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती कर्जत यांच्या कडे केल्याचा राग मनात धरून ग्रामसेवक केसकर यांनी बबन पवार यांच्या घरात समोर रस्ता न करता दुसरीकडेच करत असल्याने बबन पवार यांनी हे काम बंद पाडले आहे. 

“मलठण येथील ग्रामसेवक केसकर यांना रस्ता काम चांगले करा काळी माती वापरू नका म्हटले असता ते दमदाटी करून तुमचे घरकुलांचे पैसे काढणार नाही असा दम देत सरकारी काम असेच असते. या शिवाय जर तक्रार केली तर तुम्ही सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून पोलीस केस करेन अशी धमकी देतात.”

-सतिश वाघमारे , सामाजिक कार्यकर्ते मलठण

उपअभियंता याच्या कडून रस्ता कामाची पाहणी

कर्जत येथील गटविकास अधिकारी अमोल जाधव याच्या आदेशानुसार जिल्हा परिषद कर्जत चे उप अभियंता दिलीप कानगुडे यांनी मलठण येथे भेट देऊन सिमेंट काँक्रीट चे झालेल्या रस्ता कामाची पाहणी करून झालेल्या  या रस्ता च्या साईट पट्या त्वरित भरून घेण्यात यावे या शिवाय बबन पवार याच्या घराजवळील मातीचा भराव काढून त्या ऐवजी खडी व पक्के काँक्रीट करण करावे आणि ज्या ज्या रस्त्यांना भेगा पडल्या आहेत त्या सर्व बुजवून चांगले रस्ते करण्याचे आदेश उप अभियंता दिलीप कानगुडे यांनी दिले आहेत. हि कार्यवाही आठ दिवसात करावी अन्यथा तुमचे बील आदा केले जाणार नाही अशी समज ग्रामसेवक केसकर यांना तक्रार दार यांच्या समक्ष दिली.