बेजबाबदारपणे काम कऱणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी

जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी पत्रात म्हटले आहे की, स्मार्ट सिटी अंतर्गत टेक महिंद्रा, क्रिस्टल इंटिग्रेटीड सर्व्हिस प्रा. लि. आणि आर्सेस इन्फोटेक प्रा.लि. या कंपन्यांना काम दिले आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर अज्ञात व्यक्तीद्वारे रॅन्समवेअर हल्ला कऱण्यात आला.

    पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातील २७ सर्व्हर मधील डेटा चोरी होऊन अंदाजे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार पिंपरी चिंचवड सायबर सेल, गुन्हे शाखेकडे टेक महिंद्रा कंपनीने दाखल केली आहे. खरे तर, टेक महिंद्रा कंपनीचा हा अत्यंत बेजबाबदारपणा असून त्याला सर्वस्वी ही कंपनीच कारणीभूत आहे. आता महापालिकेने या कंपनीचे कंत्राट रद्द करावे, अशी रोखठोक मागणी जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे आज बुधवारी (दि.१०) लेखी पत्राद्वारे केली आहे.

    जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी पत्रात म्हटले आहे की, स्मार्ट सिटी अंतर्गत टेक महिंद्रा, क्रिस्टल इंटिग्रेटीड सर्व्हिस प्रा. लि. आणि आर्सेस इन्फोटेक प्रा.लि. या कंपन्यांना काम दिले आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर अज्ञात व्यक्तीद्वारे रॅन्समवेअर हल्ला कऱण्यात आला. त्याबाबत टेक महिंद्रा कंपनीचे प्रोग्राम मॅनेजर महेंद्र लक्ष्मीनारायण लाठी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याच तक्रारीत कंपनीने सत्य परिस्थिती दडविण्याचा प्रयत्न केला आहे. अत्यंत विसंगत व दिशाभूल करणारी माहिती कंपनीने दिली आहे, असे तक्रारीतच दिसते. कंपनी एकिकडे म्हणते की, रॅन्समवेअर हल्ल्यात चीन, रशिया, फ्रान्स व जर्मनी या देशातून कोणी अज्ञात व्यक्तीने सर्व्हर मध्ये अनधिकृतरीत्या `प्रवेश करण्याचा प्रयत्न` केला आहे. दुसरीकडे हे मान्य करते की, अज्ञात व्यक्तीने सर्व्हर मध्ये `प्रवेश करुन` महत्वाचा डाटा इन्क्रिप्ट केला असून महत्वाचा डेटा डिक्रीप्ट करण्याकरीता बिटकॉईन द्वारे पैशाची मागणी करत आहेत. एकिकडे `प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला` म्हणता आणि दुसरीकडे `प्रवेश करुन डेटा चोरला ` म्हणतात, हेच संशयास्पद असल्याचे सिमा सावळे यांनी नमूद केले.कंपनीच्या तक्रारीत तिसरा महत्वाचा मुद्दा असाच विसंगत आणि स्वतःवरची जबाबदारी झटकणारा आहे. तक्रार अर्जात कंपनी म्हणते,` रॅन्समवेअर हल्लात आमच्या कंपनीचे अंदाजे ५ कोटींचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.` त्याच परिच्छेदात पुढे कंपनी म्हणते, ` सदरचे प्रकल्प हे सुरवातीच्या टप्यात असल्याने या हल्ल्यात पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी बाबतची कोणतिही महत्वाची माहिती लिक झालेली नाही. एकिकडे रॅन्समवेअरमुळे डेटा इन्क्रीप्ट होऊन ५ कोटींचे नुकसान झाले म्हणता आणि दुसरीकडे महापालिकेची माहिती लिक झाली नाही म्हणतात. मग प्रश्न असा आहे की,महापालिकेसाठी स्मार्ट सिटीचे काम करत असताना डेटा इन्क्रिप्ट झाला तर महापालिकेचे नुकसान झाले नाही असे कंपनी कसे म्हणू शकते. या महितीतच कुठेतरी चोरी झाल्याचे कबुली दिली आहे, असे सिमा सावळे यांनी निदर्शनास आणून दिले. महापालिकेने जे कंत्राट टेक महिंद्रा कंपनीला दिले आहे त्यासाठी सुमारे ५२५ कोटी रुपयेंचा करार केला आहे. त्यातच निव्वळ फायर वॉलसाठी सुमारे १५ कोटी रुपये कंपनीला देण्याची खास तरतूद आहे. कुठलिही जोखीम न घेता सर्व माहिती सुरक्षित ठेवण्यासाठीच महापालिकेने मोठी रक्कम या कंत्राटासाठी मोजली आहे. याचाच दुसरा अर्थ, सायबर हल्ला झाला किंवा डेटा चोरी झाला असेल अथवा कुठलेही नुकसान झाले असेल तर ती सर्व जबाबदारी टेक महिंद्रा या कंपनीचीच आहे. मूळच्या कंत्राट करारा मध्ये फॉर्टीनेट कंपनीच्या फायरवॉल असतील असे मान्य केले होते. प्रत्यक्षात सप्टेंबर २०१९ मध्ये सिस्को फायर पॉवर या कंपनीच्या फायरवॉलसाठी टेक महिंद्रा ने महापालिकेकडे परवनागी मागितली होती. महापालिकेने परवानगी नाकारली, पण टेक महिंद्राने परस्पर काही बदल केले तर नाही ना, याबाबत आता संशय आहे. अद्याप या सायबर हल्ल्यात महापालिकेचे नेमके किती व काय नुकसान झाले ते समोर आलेले नाही, असेही सिमा सावळे यांनी पत्रात म्हटले आहे.
    अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे टेक महिंद्रा म्हणते की, एक पोर्ट ओपन राहिला असावा. याचाच अर्थ कंपनीचे या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष होते.

    आमच्या माहितीनुसार सोल्युशन आर्कीटेक्ट, स्काडा एक्सपर्ट आणि आयओटी एक्सपर्ट अशा उच्च तंत्रज्ञांची नियुक्ती करण्याची ग्वाही मूळ करारातदिली होती. प्रत्यक्षात दुय्यम दर्जाचे आणि अपेक्षेपेक्षा कमी मनुष्यबळ नियुक्त केल्याने ही वेळ आली. इतक्या गंभीर प्रकल्पात प्रत्यक्ष जागेवर येऊन काम कऱणे अपेक्षित होते. तर कोरोनाचे कारण देऊन या काळात चक्क घरातून काम केल्याने सुरक्षेत हलगर्जिपणा झाला आहे. आणखी महत्वाचा संशय आहे, तो म्हणजे, टेक महिंद्रा कंपनीने पोटठेकेदार तर नेममलेला नाही ना. स्मार्ट सिटीच्या इतर महत्वाच्या कामात पोटठेकदार नियुक्त केल्याचेदिसते, त्यामुळे इथेही संशयाला जागा असल्याचे सावळे यांनी पत्रात म्हटले आहे. २७ फेब्रुवारी २०२१ ला सकाळी ११.१५ ला सायबर हल्ला होतो आणि गुन्हा चक्क १५ दिवसांनी म्हणजे ९ मार्च रोजी दाखल होतो. त्यातही अत्यंत मोघम तपशिल दिला जातो. हेसुध्दा संशयास्पद आहे. इतक्या उशिरा गुन्हा दाखल का केला, ५ कोटींचेच नुकसान झाले त्याला आधार काय ते कुठेही नमूद केलेले नाही. कंपनीने म्हटले तितकेच नुकसान आहे की आणखी काही लपवले आहे ते समजले पाहिजे. या सर्व प्रश्नांची उत्तर नागरिकांनी मिळाली पाहिजेत, अशी मागणी सिमा सावळे यांनी केली आहे. स्मार्ट सिटी च्या सर्व्हरवरचा हल्ला आणि त्यातून झालेले अथवा आणखी किती होणार त्या नुकसानीला टेक महिंद्रा या कंपनीचा बेजबाबदारपणाच कारणीभूत आहे. पिंपरी चिंचवड शहराची स्मार्ट सिटी म्हणून आज वेगळी ओळख आहे. अशात हा सायबर हल्ला म्हणजे एक प्रकारे महापालिकेची सुध्दा नाचक्की झाली आहे. सर्वच प्रकरण अत्यंत संशयास्पद आहे आणि त्याला टेक महिंद्रा कंपनीचा गलथान कारभारच जबाबदार आहे. यापढील काळात आणखी नुकसान होऊ नये यासाठी तत्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आता टेक महिंद्रा कंपनीवर जबबादारी निश्चित करून त्यांचे कंत्राट तत्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी पत्राद्वारे केली आहे.