चिकनला मागणी वाढली ; बाजारभाव कडाडले

मंचर : कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांनी मांसाहार करण्यास सांगितले असल्याने चिकन, मटणला मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम चिकनच्या बाजारभावात वाढ होवुन किरकोळ विक्रेते चिकन प्रतिकिलो १८० ते १९० रुपये बाजारभावाप्रमाणे ग्राहकांना विकत असल्याचे आंबेगाव तालुक्यातील चिकन विक्रेत्यांनी सांगितले.

चिकन मटणला दोन महिन्यांपुर्वी फारसा उठाव नव्हता.गेल्या १५ ते २० दिवसांपूर्वी १२० रुपये किलो दराने मिळणारे चिकन सध्या १८० ते १९० रुपये किलो दराने मिळत आहे, अशी माहिती चिकन व्यवसायिक इसाक शेख,इम्रान मोमीन, जावेद मिस्त्री, फिरोज मिस्त्री यांनी दिली. कोरोनाच्या पाश्र्वभूमीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांनी मांसाहार करण्यास सांगितले असल्याने चिकन, मटण खाण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला आहे.

– शेतकरी व कंपनीचालक समाधानी
किलोमागे चाळीस ते पन्नास रुपयाची वाढ झाल्याने स्वस्त दराने मिळणारे बॉयलर कोंबडीचे चिकन भाव खाऊ लागले आहे. मटणाचा दर सध्या ५६० ते ६०० रुपयांच्या दरम्यान आहे. चिकनचे दर असेच वाढत राहिल्यास २०० रुपयांची पातळी गाठण्याची शक्यता घाऊक बाजारात वर्तविण्यात येत आहे. मंध्यतरी बाजारभाव नसल्याने पोल्ट्री व्यवसायिकांनी कोंबड्यांची पिल्ले गाडून टाकली होती. तसेच काही पोल्ट्री चालक व कंपन्यांनी १०० रुपयांना ३ ते ४ कोंबड्या आठवडे बाजारात जावून विकल्या होत्या. थोड्या फार प्रमाणात बाजारभाव वाढल्याने शेतकरी व कंपनीचालक समाधानी आहेत.