शिक्षकांना ‘कोविड १९’ च्या कामातून कार्यमुक्त करण्याची मागणी

इंदापूर  : इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना शासनाने मार्च २०२० पासुन ग्रामीण भागात व खेडोपाडी, वाड्या वस्त्यांवरील शिक्षणा बरोबरच कोविड १९ कामाची अतिरीक्त जबाबदारी दिली असुन एकाच वेळी विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण व कोविड १९ या दोन जबाबदार्‍या पार पाडणे शक्य होत नसल्याने इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना कोविड १९ कामातुन मुक्त करण्याची मागणी इंदापूर तालुका स्वाभिमानी शिक्षक परीवाराचे नानासाहेब नरुटे, सहदेव शिंदे, शशिकांत शेंडे, सुहास मोरे, बाळासाहेब चव्हाण याांनी इंदापूर पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

-शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील शिक्षकांना ग्रामीण भागामध्ये घरोघरी भेट देवुन नागरिकांचे सर्व्हेक्षण करणे, कोवीड चेकपोस्ट नाके, कोविड १९ सेंटरवर ड्यूटी करणे यासारखी जबाबदारीची कामे पार पाडावी लागत आहेत. एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्राथमिक शिक्षक कधीही या कामापासून दूर गेला नाही. ते प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. परंतू त्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाचा वेग वाढविण्यासाठी आॅनलाइन शिक्षणाचीही जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत असुन एकाच वेळी दोन महत्वाच्या जबाबदार्‍या पार पाडणे हे काम फार अवघड व त्रासदायक असल्याने प्राथमिक शिक्षकांना कोविड १९ च्या कार्यातून मुक्त करण्याची मागणी शिक्षकवर्गातुन केली जात आहे.

शिक्षकांना कोवीड १९ च्या कामात नियुक्तीपूर्वी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण,पी.पी.इ किट सारखे साहित्य दिलेले नसताना शिक्षकांना सरळ कोविड सेंटरवर नियुक्त करण्यात आले आहे. तर रस्त्यांवर चेकपोस्ट साठी नियुक्त्या, ग्रामीण आणि शहरी भागात घरोघर जाऊन टेंम्परेचर नोंद करून सर्व्हे करणे अशा प्रकारच्या जीव धोक्यात घालणार्‍या जबाबदार्‍या प्राथमिक शिक्षकांना दीलेल्या आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागचे, शासन परिपत्रक१७ आॅगष्ट २०२० अन्वये प्राथमिक शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी कोविड १९ च्या कार्यातून कार्यमुक्त करण्याची मागणी इंदापूर तालुक्यातील स्वाभिमानी शिक्षक परिवारातील शिक्षक संघ, इब्टा, मागासवर्गीय शिक्षक संघटना,शिक्षक भारती या शिक्षक संघटनांनी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांचेकडे केली असुन गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनाही निवेदनाची एक प्रत देण्यात आली असल्याची माहीती मागास वर्गीय शिक्षक संघटनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष सुहास मोरे यांनी दिली आहे.