खेडच्या गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण तात्काळ हटविण्याची मागणी

शिवसेना नेते मालोजीराजे काकडे-देशमुख यांचे प्रशासनास निवेदन

कर्जत : खेड (ता.कर्जत) येथील गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेले अतिक्रमण तात्काळ हटवावे या मागणीचे निवेदन शिवसेना नेते मालोजीराजे काकडे-देशमुख यांच्यावतीने प्रशासनाच्या विविध विभागाला देण्यात आले.

खेड या ठिकाणी गायरान व गावठाण असे दोन्ही प्रकारचे मोठे क्षेत्र आहे. मात्र सध्या या शासकिय मालमत्तेचे काही लोकांकडून खाजगीकरण होताना दिसत आहे.अतिक्रमण करून त्या जागेवर पक्की घरे, तसेच इतर कामासाठी ताबा घेण्यात आला आहे.या शासकीय मालमत्तेची अनधिकृत खरेदी-विक्री होण्याचे प्रकारही घडले आहेत.खेड गावासाठी लाभलेल्या क्षेत्रात चंदन, बाभळ,जांभूळ इत्यादी प्रकारची झाडेही नेस्तनाबूत झाली आहेत.गेली अनेक वर्षांपासुन हळूहळू होत असलेल्या गायरान व गावठाण जमिनीवरील अतिक्रमणाने आता सिमा गाठली आहे. खेडच्या कार्यक्षेत्रात असलेल्या शासकीय जमीनीवर अक्षरशः काही लोकांनी इतके अतिक्रमण केले आहे की शिल्लक जागांवरही दगड-गोटे टाकून त्यावर आपला अधिकार गाजवण्यास सुरुवात केली आहे.याअगोदरही खेड येथे शासकीय जागेवर बांधकामे बांधण्यासाठी मारहाणीचे अनेकदा प्रकार घडले आहेत. मात्र याकडे स्थानिक ग्रामपंचायत अथवा जिल्हा प्रशासनाकडुन कोणतीच दखल घेण्यात आली नाही. सध्या अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला असुन वेळीच प्रशासनाने लक्ष घालून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.या सर्व जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढून या शासकीय जागेचा शासन निर्णयानुसार योग्य वापर करण्यात यावा असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.खेडच्या अतिक्रमणाबाबत नगरच्या जिल्हाधीकाऱ्यांपासुन राज्यशासनाच्या विविध विभागाला ऑनलाईन तक्रारदेखील करण्यात आल्याचे काकडे-देशमुख यांनी सांगितले.

अतिक्रमणाबाबत खेडकरांचे ‘वेट अँड वॉच’

खेड येथील अतिक्रमण सध्या चर्चेचा विषय बनला आहे.या ठिकाणी अतिक्रमण करून करण्यात आलेली पक्की बांधकामे,शासकिय जागेची अनधिकृत खरेदी-विक्री,एका-एका व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत असलेले अतिक्रमण या सर्व बाबी विचारात घेऊन प्रशासन कधी आणि काय कारवाई करेल याकडे खेडकर ‘वेट अँड वॉच’च्या भुमिकेत आहेत.