जि.प.शाळेतील जमीनदोस्त करण्यात आलेल्या खोल्यांची मोकळी जागा 
जि.प.शाळेतील जमीनदोस्त करण्यात आलेल्या खोल्यांची मोकळी जागा 

ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओतूर नं.१ एक मुलांच्या शाळेतील वर्ग खोल्या पाडल्याने ओतूर परिसरातील ग्रामस्थ,स्थानिक नागरिक व माजी विद्यार्थ्यांनी शालेय प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.

ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओतूर नं.१ एक मुलांच्या शाळेतील वर्ग खोल्या पाडल्याने ओतूर परिसरातील ग्रामस्थ,स्थानिक नागरिक व माजी विद्यार्थ्यांनी शालेय प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.

ओतूर येथील जिल्हा परिषद शाळा नं.१ येथील सुस्थितीत असलेल्या मुलांच्या शाळेतील वर्ग खोल्या पाडून त्यांच्या जुन्या सागवान लाकूड व घडीव दगडाची विक्री  करताना जाहीर नोटीस न देता विक्री केल्याचा प्रकार येथे घडला असल्याबाबत येथे जोरदार चर्चा आहे.इमारतीचे साहित्य विक्री करताना शासकिय नियमांची पायमल्ली संबंधीतांकडुन करण्यात आली असल्याचा आरोप ओतूर मधील सुज्ञ नागरिक करित आहेत.

या खोल्या पाडतेवेळी या परिसरातील मोठ- मोठ्या जुन्या वृक्षांची कत्तल करुन त्यांची विल्हेवाटही लावण्यात आली.सुस्थितीत असलेल्या जुण्या घडीव दगडाच्या खोल्या जमीनदोस्त करण्यात आल्या.आपल्या साक्षिणे अनेकांचे यशस्वी जीवन घडविलेल्या व या शाळेकडे बघुन विद्यार्थ्यांच्या आठवणींना नेहमीच उजाळा मिळुन स्फुर्ती देणाऱ्या तसेच एका सुसंस्कृत ईतिहासाची साक्ष देणाऱ्या जि.प.शाळेचे  ब्रिटीश कालीन बांधकाम पाडणे खरच आवश्य होते का?असा सवाल माजी विद्यार्थ्यांमधुन उपस्थित होत आहे.या पाडलेल्या वर्ग खोल्यांचे जुने सागवान लाकूड व घडीव दगडी आदी साहित्य कोणतीही जाहिर नोटीस न देता मुख्याध्यापक व शालेय शिक्षण समितीने मनमानी करुन या साहित्याची विक्री केली असल्याचे समजते.जाहीर नोटीस देऊन या साहीत्याची विक्री केली असती तर आता कवडीमोल भावात विक्री झालेले साहीत्याची जास्तीत जास्त रक्कम मिळुन शासनाच्या तिजोरीत जमा झाली असती मात्र या विक्री प्रक्रीयेत कोणाचा कसा रोल आहे? ही देखील अंतर्गत चर्चा ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांच्यातून होत आहे.

बांधकाम पाडलेल्या शाळेच्या साहीत्याची नियमाला धरुन विक्री न करणाऱ्या  संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे.हे साहीत्य शाळेत जमा करुन जाहीर नोटीसीने लिलाव करण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधुन जोर धरु लागलीय.यासंदर्भात येथील काही नागरिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार,राज्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख,पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षा निर्मला पानसरे ,पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे,जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके,जुन्नर पंचायत समिती सभापती,गटविकास अधिकारी यांची शिष्ठमंडळामार्फत भेट घेऊनत्यांना निवेदने देणार असल्याचे समजते.

या संदर्भात जुन्नर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी के.बी.खोडदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले ओतूर येथील पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा क्र.१ या शाळेचे बांधकाम पाडल्यानंतर त्यामध्ये निघालेले दगड,कौले,लाकडे ईत्यादी साहित्याची मुख्याध्यापक व शालेय शिक्षण समितीने जाहीर नोटीसीद्वारे लिलाव करुन विक्री करणे आवश्यक होते मात्र तसे न करता कोटेशन पद्धतीने या साहित्याची विक्री केली असल्याचे मुख्याध्यापकाने मला सांगितले असून याबाबत चौकशी करतो असे गटशिक्षणाधिकारी खोडदे यांनी बोलताना स्पष्ट केले.