कदम वाकवस्ती येथील दुय्यम निबंधक, मुद्रांक कार्यालय चालू करण्याची मागणी

लोणी काळभोर : लॉकडाउनमुळे कदम वाकवस्ती येथील दुय्यम निबंधक, मुद्रांक कार्यालय गेल्या चार महिन्यापासून बंद आहे. यामुळे पूर्व हवेली भागातील नागरिकांना खरेदी खत, इतर गरजेच्या दस्तऐवजांची नोंदणीची कामे करण्यासाठी पुणे शहरात चालू असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात कोरोना संसर्गाचा धोका पत्करून जावे लागत आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेता कदम वाकवस्ती येथील दुय्यम निबंधक, मुद्रांक कार्यालय चालू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लॉकडाउनमुळे पुणे जिल्ह्यातील दुय्यम निबंधक, मुंद्राक कार्यालये बंद होती. यामुळे ग्रामीण भागातील खरेदी-खते, इतर गरजेचे दस्तऐवजांची नोंदणी ठप्प झाली होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज २० मार्चपासून बंद करण्यात आली होती. लॉकडाउन काळात  दुय्यम निबंधक कार्यालये, मुंद्राक, जिल्हाधिकारी कार्यालये देखील बंद करण्यात आली होती.

 तद्नंतर मात्र राज्य सरकारच्या आदेशाने ज्या-ज्या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे अश्या भागातील दुय्यम निबंधक, मुद्रांक कार्यालये सुरु करण्यास जिल्हाधिकारी, जिल्हा निबंधक मान्यता देऊन सुरु करण्यात आली आहेत. परंतु पूर्व हवेलीतील दुय्यम निबंधक, मुंद्राक हवेली क्रमांक ६ कार्यालय अद्याप चालू करण्यात आले नाही.कदम वाकवस्ती हे मायक्रो कंन्टेमेन्ट झोन मध्ये येत आहे.तरी देखील दुय्यम निबंधक, मुद्रांक कार्यालय बंद असल्याने ग्रामीण भागातील खरेदी खते, इतर गरजेचे दस्तऐवजांची नोंदणी कामे ठप्प आहे. त्यामुळे सामान्य जनतेची अडचण होत आहे. सर्वसामान्य जनतेची होणारी अडवणूक लक्षात घेता कदम वाकवस्ती भागातील दुय्यम निबंधक कार्यालय लवकरात लवकर चालू करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

“नागरिकांची गैरसोय लक्षात घेता कदम वाकवस्ती येथील दुय्यम निबंधक, मुद्रांक कार्यालय सुरु करण्यात यावे.कोरोना संसर्गाचा प्रार्दुभाव होवू नये यासाठी टोकन पद्धत अंमलात आणावी.जेणेकरून शासनाच्या नियमाचे पालन होईल व नागरिकांची रखडलेली कामे मार्गी लागतील.”

-संतोष भोसले , शिवसेना लोणी काळभोर शहर प्रमुख