आषाढी एकादशीसाठी रताळ्यांना मागणी ; गतवर्षीच्या तुलनेत आवक वाढली

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बाजारात रताळ्यांची आवक सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा भागातून रताळ्यांची आवक होत आहे. कर्नाटकातील रताळ्यांची आवक अद्याप सुरू झालेली नाही. कर्नाटकातील रताळ्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्य़ातील रताळ्यांची चव गोड असते. कर्नाटकातील रताळी तुरट असतात.

    पुणे : आषाढी एकादशीला अनेक जण उपवास करतात. उपवासासाठी रताळ्यांना चांगली मागणी असते. सोलापूर भागातून श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात रताळ्यांची आवक सुरू झाली असून रताळ्यांना मागणी चांगली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो रताळ्याची विक्री ३५ ते ४५ रुपये भावाने केली जात आहे.

    आषाढी एकादशी मंगळवारी (२० जुलै) आहे. घाऊक बाजारात रताळ्यांची तीन ते साडेतीन हजार पोती एवढी आवक झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रताळ्यांची आवक वाढली असून भाव स्थिर आहेत. गतवर्षी करोनाच्या संसर्गामुळे आषाढी एकादशीला रताळ्यांची आवक कमी झाली होती, अशी माहिती रताळी व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते संघटनेचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.

    गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बाजारात रताळ्यांची आवक सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा भागातून रताळ्यांची आवक होत आहे. कर्नाटकातील रताळ्यांची आवक अद्याप सुरू झालेली नाही. कर्नाटकातील रताळ्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्य़ातील रताळ्यांची चव गोड असते. कर्नाटकातील रताळी तुरट असतात. उपवासासाठी सोलापूरमधील लहान आकारांच्या रताळ्यांना चांगली मागणी असते. नवरात्रोत्सव, आाषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, महाशिवरात्रीला रताळ्यांची आवक मोठय़ा प्रमाणावर होते. घाऊक बाजारात दहा किलो रताळ्यांना ३०० ते ३५० रुपये असा भाव मिळाला असून किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार ३५ ते ४५ रुपये प्रतिकिलो भावाने रताळ्यांची विक्री केली जात आहे, असे घुले यांनी सांगितले.