शैक्षणिक फी आकारण्यासाठी सुधारित नियमावली करण्याची मागणी

प्रा.शामल चौधरी यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी मंचर : शैक्षणिक फी वेळेवर जमा होत नसल्याने शाळांपुढे शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचे खडतर आव्हान निर्माण झाले असून राज्य शासनाने शिक्षण संस्थांवर

प्रा.शामल चौधरी यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

मंचर : शैक्षणिक फी वेळेवर जमा होत नसल्याने शाळांपुढे शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचे खडतर आव्हान निर्माण झाले असून राज्य शासनाने शिक्षण संस्थांवर ताण येऊ न देता पालकांनाही फी भरणे सोयीचे होईल. अशा स्वरुपाचा मध्य साधून शैक्षणिक फी आकारण्यासाठी सुधारित नियमावली करण्याची मागणी भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथील संस्थेच्या प्रशासन अधिकारी प्रा.शामल चौधरी यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात प्रा.शामल चौधरी म्हणाल्या,खासगी विनाअनुदानित संस्था या पूर्णपणे शैक्षणिक शुल्कावर अवलंबून असतात. या व्यतिरिक्त शासनाकडून संस्थेच्या भौतिक व पायाभूत सुविधांसाठी कोणतेही मानधन उपलब्ध करुन दिले जात नाही.त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार तसेच इमारत बांधणी, दुरुस्ती, शालेय परिसर सुधारणा,विद्यार्थ्यांना अधिकाधिक शैक्षणिक सुविधा प्रदान करणे आदी सर्व प्रकारचे खर्च भागविणे आजच्या स्पर्धात्मक  युगात शैक्षणिक संस्थांना अतिशय कठीण होत चालले आहे. यासह विविध सुविधांसाठी येणाऱ्या अतिरिक्त निधीसाठी संस्थांना अनेकदा कर्ज घ्यावे लागते. कोरोना संसर्गामुळे खासगी संस्था राज्य शासनाच्या सूचनेची अंमलबजावणी करताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेली २-३ महिने न चुकता पगार करीत आहे. मात्र संस्थांना मिळणारे शैक्षणिक शुल्क यापुढील काळात वेळेवर जमा न झाल्यास शिक्षण संस्था चालविणे संस्था चालकांना आगामी काळात अधिक कठीण होऊन बसेल. त्यामुळे या सर्व बाबींचा राज्य शासनाने सारासार विचार करुन खासगी विनाअनुदानित संस्था व शाळांना दिलासा देणे गरजेचे आहे.अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व प्रधान सचिवांकडे केल्याचे प्रा.चौधरी यांनी यावेळी सांगितले.