प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

ग्रुपमधील एका कंपनीने डीएचएलएफ यांच्याकडून ६८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्या कर्ज प्रकरणात आर्थिक घोटाळा झाला आहे. त्याप्रकरणात आरोपींनी संगनमत करून कट रचला.

    पुणे : पुण्यातील एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकांना त्यांच्या एका कर्ज प्रकरणात ईडी व आयकरने त्रुटी काढल्याने असून, दिल्लीतील ओळखीचे ईडीचे अधिकारी पुण्यात आले आहेत. हे प्रकरण मिटवण्यास व सेटल करण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागत ब्लॅकमेल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे.

    रूपेश ज्ञानोबा चौधरी (वय ४६, रा. तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, अमित मिरचंदाणी, विकास भल्ला, संतोष राठोड व इतरांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोंबर २०२१ या कालावधीत घडला आहे. याबाबत ४३ वर्षीय व्यावसायिकांनी तक्रार दिली आहे.

    तक्रारदार हे सराफ व्यावसायिक आहेत. त्यांच्या पुण्यात अनेक शाखा आहेत. दरम्यान, त्यांच्या ग्रुपमधील एका कंपनीने डीएचएलएफ यांच्याकडून ६८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्या कर्ज प्रकरणात आर्थिक घोटाळा झाला आहे. त्याप्रकरणात आरोपींनी संगनमत करून कट रचला. तसेच याप्रकरणात आयकर विभागाने आक्षेप घेतला असून, त्यात ईडी व एसएफआयओने त्रुटी काढल्या आहेत, असा बनाव रचला. त्यानंतर विकास भल्ला याने तक्रारदार यांना दिल्लीतील ईडीचे अधिकारी माझ्या ओळखीतील आहेत. ते सध्या पुण्यात आले आहेत. तुमची केस त्यांच्याकडे प्रलंबित आहे. ते प्रकरण मिटवून देतो, असे सांगितले. तर रूपेश चौधरी याने माझ्याकडे २०० मुलं असून, मी सोडणार नाही, अशी धमकी दिली.

    तक्रारदार यांना हे आयकर प्रकरण मिटवण्यासाठी (सेटल करण्यासाठी) ५० लाख रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी पोलीसांकडे तक्रार केली होती. गुन्हे शाखा युनिट एककडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. त्यावेळी मुख्य आरोपी रमेश चौधरी याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे, उपनिरीक्षक संजय गाकवाड व त्यांच्या पथकाने रूपेश याला पहाटे सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे चौकशी सुरू केली आहे. तर, अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. रूपेश याच्यावर यापूर्वी एक खंडणीचा गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे.