कोरोनाची तिसरी लाट गृहीत धरूनच योग्य पद्धतीने नियोजन करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला निर्देश

कोरोना रुग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये कमतरता भासणार नाही, यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आवश्यक वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या सुविधांमध्ये तातडीने वाढ करा, ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढू नये म्हणून सजग राहून नियोजन करणे आवश्यक आहे.

    पुणे: कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा. त्याचबरोबर आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमिडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्धता यासोबतच कोरोनाबाधित रूग्णांना उपचार सुविधांमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही, यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. ‘कोरोना’ची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करण्याच्या निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. पुण्यातील विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

    कोरोना रुग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये कमतरता भासणार नाही, यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आवश्यक वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या सुविधांमध्ये तातडीने वाढ करा, ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढू नये म्हणून सजग राहून नियोजन करणे आवश्यक आहे. आवश्यक तिथे खाटांची गरज, उपलब्धता व इतर सामग्री यासाठी सतत समन्वय ठेवावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

    यावेळी खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे, आमदार सिध्दार्थ शिरोळे तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.