धनगर जातीला अनुसूचित जमातीत समाविष्ट करु नये ; बिरसा क्रांती दलाची मागणी

मंचर : धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करु नये,अशी मागणी बिरसा क्रांती दल आंबेगाव तालुका यांच्यावतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिपक कालेकर यांना निवेदन देऊन करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, धनगर ही जात आहे. जमात नाही. धनगर,धनगड हे दोन्ही  शब्द अनुसूचित जमातीच्या सुचित नाहीत.धनगड ही जमातच नाही. तरीही काही गैर आदिवासी लोकप्रतिनिधी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सुचित घुसविण्यासाठी असंवैधानिक मागणीचा पाठपुरावा करतांना दिसत आहे. याबाबत बिरसा क्रांती दल जाहीर निषेध नोंदवित आहे. धनगर जातीचा या जमातीशी तीळमात्र संबंध नाही. आदिवासींच्या कोणत्याही निकषात धनगर जात बसत नाही. धनगर आदिवासी नाहीत.धनगर जातीच्या नेत्यांची व काही गैरआदिवासी लोकप्रतिनिधींची मागणीच असंवैधानिक आहे.त्यामुळे त्यांचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करु नये. निवेदन देतेवेळी बिरसा क्रांती दल आंबेगाव तालुका कार्याध्यक्ष तथा सरपंच दिपक चिमटे,उपाध्यक्ष शंकर मोहंडूळे, सरपंच राजेंद्र गाडेकर आदी उपस्थित होते.