maratha reservation

आंदोलनासाठी मराठा समाज आक्रमक
बारामती : मराठा आरक्षण कायम राहण्यासाठी बारामती येथील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शनिवारी बारामती शहरातील उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्यासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे…’, अशा घोषणेने अजित पवार यांच्या बंगल्याचा परिसर दणाणून गेला होता.
अखिल भारतीय मराठा महासंघ शहरप्रमुख ॲड. विशाल बर्गे, नगरसेवक सचिन सातव, संभाजी माने, हनुमंत भापकर, ज्ञानेश्वर माने, विजय तावरे, सूर्यकांत तावरे, रोहन पाटील, रोहन शेरकर आदींसह शेकडो आंदोलक या आंदोलनात सहभागी झाले होते. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनासाठी मराठा समाज बांधव शनिवारी सकाळी बारामती शहरातील पीएनजी चौकात एकत्र आले. त्यानंतर भिगवण रोड वरील सहयोग सोसायटीतील अजित पवार यांच्या बंगल्यासमोर आंदोलकांनी ढोल वाजवून मराठा आरक्षणाकडे सरकरचे लक्ष वेधून घेतले. यावेळी आंदोलकांनी अजितदादांच्या नावे त्यांच्या स्वीय सहायकाकडे मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले.

– मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे
सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी मराठा आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे सुपूर्त करताना स्थगिती आदेश दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे घटना तज्ञांचा व कायदेविषयक तज्ञांचा सल्ला घेऊन ही स्थगिती उठविण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर बाब अवलंबित करावी. मराठा आरक्षण खंडित होऊ न देता पूर्ववत चालू ठेवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयातील खटला लवकर चालविण्यासाठी न्यायालयाला विनंती करावी. न्यायालयाचा स्थगिती आदेश येण्यापूर्वी एसईबीसी प्रवर्गातील जे शैक्षणिक प्रवेश झालेले आहेत तसेच बहुतांश टप्पे पूर्ण झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पहिल्यापासून प्रक्रिया राबवायची असेल तर त्यायोगे या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यावर त्यांचा कोणताही दोष नसताना त्यांना प्रवेशापासून मुकावे लागणार आहे. अशा विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी प्रशासकीय व न्यायालयीन पातळीवर न्याय निर्णय होणे गरजेचे आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेश संरक्षित करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.