चक्क पेट्रोल पंपातील टाकीतून डिझेल चोरणारी टोळी जेरबंद ; १६ लाख २८ हजाराचा मुद्देमाल जप्त

-स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

बारामती : जिल्ह्यात पेट्रोल पंपांतील पेट्रोल आणि डिझेल चोरणार्‍या आंतरराज्य टोळीतील तीघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील एक ट्रक, २ कॅन, मेटल कटर पान्हा, पाईप, मोबाईल असा १६ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

श्रीराम लाला काळे (वय १९), दशरथ भीमा काळे (वय २१), नाना गोविंद पवार (वय ५६, सर्व रा. तेरखेडा, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.पुणे जिल्ह्यात पंपावरील पेट्रोल आणि डिझेल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अशा गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी पथक तयार केले होते. या पथकाने इंधन चोरीबाबतच्या गुन्ह्यांची माहिती घेतल्यानंतर ट्रान्स्पोर्ट व्यवसायातील टोळी पेट्रोल, डिझेल चोरी करीत असल्याचे स्पष्ट झाले होते. शिवाय, सर्व संशयित वारंवार ट्रकमधून माल घेऊन पुणे बाजूकडे येत असल्याचेही स्पष्ट झाले होते.मंगळवारी(दि २२) विशेष पथकाला संशयित हे तेरखेडा (ता. वाशी,जि. उस्मानाबाद) येथील असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पथकाने तेरखेडा येथील फाट्यावरील एका पंपाची टेहळणी करताना 3 जण दिसून आले. त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील पंपावरून पेट्रोल, डिझेल चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदरच्या आरोपी इंदापूर तालुक्यातील वडापुरी, लासुर्णे , नातेपुते, अकलूज या भागातील पेट्रोल पंपातील एकुण १७ हजार ७१८ लिटर डिझेल ऐकून १३ लाख ४० हजार रु किंमतीचे चोरी केले आहे.सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट ,पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर,पोलिस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, उमाकांत कुंजीर,काशीनाथ राजपुरे, विजय कांचन,अभिजित एकशिंगे पोलिस नाईक जनार्दन शेळके,राजू मोमिन,पोलिस हवालदार धिरज जाधव यांनी केली आहे. दरम्यान सदरच्या गुन्ह्यातील आरोपी दशरथ भीमा माने याच्यासह त्याच्या साथीदारावर रामदुर्ग ,खानापूर भेल गोल (कर्नाटक) ,शंखेश्वर बार्शी, मिरज, तासगाव या पोलिस ठाण्यात डिझेल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यात डिझेल चोरीचे व इतर ८ गुन्हे दाखल आहेत .

ही टोळी पेट्रोल पंपाची टेहळणी करून पंपावरील कर्मचाऱ्यांना आपला १२ चाकी ट्रक सह मुक्कामी थांबणार असल्याचे सांगून, तो ट्रक पंपापेट्रोल- डिझेल च्या टाकीजवळ आडवा लावून टाकीत पाईप टाकून मोटारीच्या सहाय्याने डिझेल उपसून ट्रक मधील ब्रेल मध्ये सोडत असे. काही पंपचालकांना डिझेल अचानक कमी झाल्याने संशय आला.दरम्यान डिझेल चोरल्यानंतर पहाटे ही टोळी निघून जात होती.