इंदापूरात गर्दी न होता गावागावात पोहोचला विकासकामांचा डिजिटल भूमिपूजन कार्यक्रम

बारामतीच्या 'स्टर्लिंग सिस्टीम्स्चे' तंत्रज्ञान ; ग्रामीण भागातील पहिलाच मोठा प्रयोग यशस्वी

  बारामती : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सात गट व इंदापूर शहरातील विविध विकासकामांचे ऑनलाइन भूमीपूजन व उद्घाटन सोहळा यशस्वीरित्या पार पडला. या सोहळ्यात मुंबईहून खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मतदारसंघातील तब्बल १२८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे डिजिटल उद्घाटन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांनी या सोहळ्यात अचानक उपस्थिती लावून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे इंदापूर तालुक्यातील जनतेशी संवाद साधला. त्यांना स्क्रीनवर पाहताच लोकांनी एकच जल्लोष केला.

  कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. त्यावर उपाय म्हणून गर्दी टाळत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत राज्यमंत्री भरणे यांनी ऑनलाइन भूमीपूजन व उद्घाटन सोहळा घेण्याचे ठरविले. यानिमित्ताने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात गटातील गावांमधील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सदस्यांसह आमदार आणि खासदारांना एकाच ऑनलाइन व्यासपीठावर आणले गेले. सर्व सात गट व इंदापूर शहर ऑनलाईन पद्धतीने निमगाव केतकी येथील मुख्य व्यासपीठाशी जोडून चक्क मुंबई येथून या विकास कामांचे उद् घाटन करण्यात आले.

  यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे भाषण करताना, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणाऱ्या या लाइव्ह उदघाटन सोहळ्यास खासदार शरद पवार देखील असते तर बरे झाले असते, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात शरद पवार सुद्धा स्क्रीनवर दिसू लागले. त्यांनी सर्वांना हात जोडून शुभेच्छाही दिल्या. पवारांच्या दर्शनाने उत्साहित झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा एकच गडगडाट केला. यावेळी पवार यांनी थेट संवाद साधत इंदापूरकरांना शुभेच्छा दिल्या.

  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संकल्पनेतून तसेच खासदार सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती येथील ‘स्टर्लिंग सिस्टिम्स’चे प्रमुख सतिश पवार यांनी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करत संयोजक टीममधील चेतन गावडे, प्रसाद चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने या ऑनलाइन सोहळ्याचे नियोजन केले होते. इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात गटांतील मदनवाडी, कळंब, शिरसवडी, वडापुरी, सपकळवाडी, सराटी, निमगाव केतकी ही ७ गावे आणि इंदापूर शहर अशा एकूण ८ ठिकाणी विविध विकास कामांच्या ऑनलाइन उद्घाटनाचे निश्चित झाले. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून इंटरनेट सुविधेसह एलईडी वॉल स्क्रीन, लाइव्ह कॅमेरे आणि संगणकीय तंत्रज्ञानाची जोडणी केली. त्यासोबतच टीमला प्रशिक्षण दिले तसेच सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व तांत्रिक नियोजन करण्यात आले.

  निमगाव केतकी येथे उभारलेल्या मुख्य व्यासपीठावर राज्यमंत्री भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तर मुंबई येथून खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार सहभागी झाले होते. या निमित्ताने कार्यक्रमासाठी लोकांना बोलावून गर्दी करण्यापेक्षा, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला डिजीटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऑनलाइन लाइव्ह कार्यक्रमाद्वारे जोडून घेत कार्यक्रमच ग्रामीण भागातील लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा हा अभिनव उपक्रम यशस्वी झाला.

  कोरोनाचं संकट असल्याने मोठी गर्दी जमवून हा कार्यक्रम घेणं शक्य नव्हतं म्हणून राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या संकल्पनेतून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जनतेपर्यंत हा कार्यक्रम ऑनलाइन घेऊन जाण्याचं ठरवलं. ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा, लाइव्ह व्हिडीओ कॉन्फरन्सिग आणि फेसबुक पेजवर लाइव्ह हे आव्हानात्मक होते. हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे हे तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पना लोकसभा मतदारसंघात राबवत असतात. राज्यमंत्री भरणेमामा यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील पहिलाच ऑनलाइन उद् घाटनाचा प्रयोग यशस्वी झाला याबद्दल समाधान वाटते.

  - सतिश पवार, संचालक, स्टर्लिंग सिस्टिम्स्