महसूल दिनापासून डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा होणार उपलब्ध

उजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली माहिती 

कवठे येमाई : महसूल विभागाच्या महाभूमी प्रकल्पाअंतर्गत ई फेरफार कार्यक्रमाअंतर्गत  डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा (गाव नमुना नं.८ अ ) आता  ही एक आणखी  नवीन सुविधा उद्या दिनांक १ ऑगस्ट पासून सुरु केली जात आहे. त्याचा शुभारंभ मा. बाळासाहेब थोरात महसूल मंत्री यांचे शुभ हस्ते महसूल दिनी ऑनलाईन पद्धतीने होत आहे. महाभूमी पोर्टल वर संगणकीकृत अभिलेखापैकी फक्त सातबारा डिजिटल स्वाक्षरीने जनतेला डाऊनलोड साठी उपलब्ध होता आता त्यासोबतच डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा देखील मिळणार आहे. कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, पीक कर्ज किंवा जमीन खरेदी विक्रीसाठी सातबारा सोबतच खाते उतारा देखील आवश्यक असतो.  त्यामुळे महसूल विभागाने ख्स्ते उतारा देखील तलाठी यांचे डिजिटल स्वाक्षरीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा पुण्याचे उजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी बोलताना दिली.  

महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी १ ऑगस्ट हा महसूल दिन उत्साहाने साजरा करण्यात येतो. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महसूल दिन साध्या पद्धतीने व सर्व निर्बंध पाळून साजरा करण्याचे निर्देश अप्पर मुख्य सचिव महसूल डॉ. नितीन करीर यांनी दिले आहेत.  त्यामुळे हा शुभारंभ देखील ऑनलाईन पद्धतीने होत आहे. यावेळी महसूल राज्य मंत्री ना.अब्दुल सत्तार, अप्पर मुख्य सचिव महसूल डॉ. नितीन करीर, जमाबंदी आयुक्त चोक्कलिंगम, सह सचिव महसूल  संतोष भोगले व राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र पुणे येथील तंत्रज्ञ , सर्व विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी व ई फेरफार प्रकल्पाचे जिल्ह्याचे समन्वयक उप जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार असल्याची माहिती रामदास जगताप यांनी दिली.