प्रश्नांवर चर्चा करा ; सत्ताधाऱ्यांकडे विरोधकांची मागणी

पुणे : काेेराेना (Corona)परीस्थिती, पावसाळ्यात साचणारे पाणी, िपण्याच्या पाण्याचा प्रश्न अादी विषयांवर चर्चा करण्याची विराेधी पक्षाच्या नगरसेवकांनी  करीत सर्व साधारण सभेत जाेरदार घाेषणाबाजी केली. तर राज्य सरकारच्या अादेशानुसार सभा चालविता येणार नाही असा दावा करीत सत्ताधारी भाजपने सभा तहकुब केली.
सलग चाैथ्या महीन्यात महापालिकेची सर्वसाधारण सभा चालविण्यावरून  सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अाराेप प्रत्याराेप झाले.  सभा चालवण्यासाठी राज्य शासनाची परवानगी नाही, त्यामुळे सभा तहकुब करावी, अशी मागणी सत्ताधारी नगरसेवकांनी केली. विविध प्रश्नावर प्रशासनाकडून खुलासा झाला पाहीजे , अशी मागणी करत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी अशा घोषणाबाजी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून महापालिकेच्या सभा तहकुब केल्या जात आहेत. राज्य शासनाने पालिकेच्या सभा ऑनलाईन पद्धतीने चालवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सभेस सभागृहामध्ये पदाधिकारी व काही नगरसेवक प्रत्येक्ष तर काही ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. सभा सुरू झाल्यानंतर शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी शहरातील पावसाळी कामे रस्त्यावर साचणारे पाणी यासंदर्भात प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी केली.

तर नगरसेवक योगेश ससाणे यांनी शहरात पाऊस सुरू असताना, नदी, नाले ओढ्यांमधून पाणी वाहत असताना, आणि मध्यशहरात चोवीस तास पिण्याचे पाणी सुरू असताना, हडपसरकरांना मात्र पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आम्ही काम पावसाचे साचलेले पाणी प्यायचे का, महापालिका (Pune Municipal Corporation) हडपसरवासियांना सावत्र भावाची वागणूक का देत आहे, असे प्रश्न उपस्थित करून खुलासा करण्याची मागणी केली. गफुर पठाण यांनी शहरातील कोरोना परिस्थिती बेड यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले, तर अविनाश बागवे यांनी कामे करण्यासंदर्भात प्रशासनाने काही आदेश काढले आहेत का अशी विचारणा केली. काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी गतवर्षी आलेल्या पूराच्या पार्श्वभूमीवर काय उपाय योजना केल्या आहेत, याची माहिती देण्याची मागणी केली.

यावेळी सभागृहनेते धीरज घाटे यांनी राज्य शासनाने सभा चालवण्यास परवानगी दिलेली नाही, त्यामुळे सभा तहकुब करण्याची मागणी करत सभा तहकुबी मांडली. त्यांच्या तहकुबीला श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर, दिपक पोटे यांनी पाठबळ दिले. या तहकुबीवरून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार अक्षेप घेत महापौरांसमोर येऊन घोषणाबाजी केली. विरोधी पक्ष ठाकरे सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप यावेळी सत्ताधार्‍यांनी केली.

शेवटी महापालिका अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पावसाळी कामांच्या संदर्भात विविध विभागांनी उपाय योजना केल्याचा खुलासा केला. मात्र, मोघम खुलासा करूनका, सविस्तर माहिती द्या, अशी मागणी सुभाष जगताप यांनी केली. तर अरविंद शिंदे यांनी कल्व्हर्ट निवीदेतील भ्रष्टाचाराची माहिती देण्याची मागणी केली. यावेळी मनसे गटनेते वसंत मोरे यांनी सत्ताधारी व विरोधक संगणमत करून गोंधळ करत असल्याचा आरोप केला. या गोंधळातच सभागृह नेत्यांनी सभा तहकुबी मांडली आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सभा तहकुब केली.