कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे निर्जंतुकीकरण

कवठे येमाई : शिरूरच्या पश्चिम भागातील कवठे येमाई परिसरातील गावे,वाड्या वस्त्यांतिल नागरिकांना,रुग्णांना सर्वोत्तम व जलद शासकीय आरोग्य सेवा मिळत असलेल्या कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक वैद्यकीय अधिकारी,औषध निर्माता व परिचर अशा तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर तेथे कार्यरत असणारे दुसरे वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱयांची कोरोना तपासणी करण्यात आली. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने व पहिले पॉझिटिव्ह असलेले ३ जण क्वारंटाईन असल्याने नागरिकांना शासकीय आरोग्य सेवा उपलब्ध रहावी म्हणून कवठे येमाई ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण आरोग्य केंद्राचे कोरोना प्रतिबंधात्मक औषध सोडीयम हायपोक्लोराईट द्रावण फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती सरपंच अरुण मुंजाळ यांनी दिली. तर दुसरे वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा सज्ज झाले असून नागरिकांनी शासकीय आरोग्य सेवा घेण्यासाठी आरोग्य केंद्रात यावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

कवठे येमाई व परिसरातील सर्वसामान्यांसह गोरगरीबांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी वरदान ठरत असलेल्या येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ३ जणांना कोरोनाची बाधा झाली. पर्यायाने तेथे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. आरोग्य अधिकारी व कर्मचारीच कोरोना बाधित झाल्याने गाव परीसरात चिंतेचा विषय होत खळबळ उडाली होती.सुदैवाने इतरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने गावात समाधान व्यक्त करण्यात आले.आता शासकीय आरोग्य सेवा पुनश्च सुरु होणार असल्याने आरोग्य विभागातील हे कोरोना बाधित पण सध्या क्वारंटाईन असलेले ३ जण लवकर बरे होऊन सेवेत दाखल व्हावेत अशी सदिच्छा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.