चोरांचे, खुन्यांचे सरकार बरखास्त करा – प्रकाश आंबेडकरांची मागणी

हे सरकार चोरांचे, खुन्यांचे असून ते बरखास्त करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. उद्या सोमवारी दुपारी वंचितचे एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेऊन ही मागणी करणार - प्रकाश आंबेडकर

    पुणे: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणी राज्य सरकारच बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे उद्या सोमवारी मागणी करणार असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
    पुण्यात प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, हे सरकार चोरांचे, खुन्यांचे असून ते बरखास्त करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. उद्या सोमवारी दुपारी वंचितचे एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेऊन ही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    विधानसभा बरखास्त करू नका
    उद्या दुपारी सव्वाबारा वाजता राज्यपालांनी भेटीची वेळ दिली असून त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देणार आहोत. हे सरकार बरखास्त करावे, मात्र सरकार बरखास्त करीत असताना सभागृह बरखास्त करू नये, असेही राज्यपालांना सांगणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडी चे उपाध्यक्ष डॉक्टर अरुण सावंत, ॲड. धनराज वंजारी तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा ठाकूर हे या शिष्टमंडळात असतील अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली आहे.