महापारेषणच्या कामथडी उपकेंद्रात बिघाड

महावितरणच्या दोन वीज उपकेंद्रांचा वीजपुरवठा ठप्प
बारामती : महापारेषण कंपनीच्या कामथडी १३२/३३ केव्ही उपकेंद्रातून निघणाऱ्या निरा देवघर या ३३ केव्ही उच्च दाब वहिनीचा ब्रेकर मंगळवारी (दि.१३) दुपारी साडेतीनच्या सुमारास नादुरुस्त झाल्याने या वाहिनीवर अवलंबून असलेल्या खानापूर व निगुडघर ३३ केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. महापारेषण कंपनीने बिघाड दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून, मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत केला जाणार आहे.
भोर तालुक्यात गेली दोन दिवस विजेच्या प्रचंड कडकडाटासह पाऊस सुरु असून त्यामुळे वीज यंत्रणेत बिघाड होत आहेत. भोर तालुक्यातील कामथडी येथे १३२/३३ केव्ही अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातून निरा देवघर ३३ केव्ही वाहिनीद्वारे महावितरणच्या खानापूर व निगुडघर या ३३ केव्ही उपकेंद्रांना वीजपुरवठा होतो. दरम्यान आज दुपारी १५.३० च्या सुमारास या वाहिनीच्या ब्रेकरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन तो फुटला आणि त्यातून होणारा वीजपुरवठा ठप्प झाल्याने महावितरणच्या दोन ३३ केव्ही उपकेंद्रांना त्याचा फटका बसला.

खानापूर व निगुडघर ३३ केव्ही उपकेंद्रातून विसगाव खोरे, चाळीस गाव खोरे व हिरडस मावळ या भागातील साधारणपणे ६६०० वीज ग्राहकांना वीजपुरवठा होतो. हा सर्व भाग या बिघाडामुळे प्रभावित झालेला आहे. बिघाड दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, जुना ब्रेकर काढून त्याठिकाणी नवीन ब्रेकर बसविण्याचे काम सुरु आहे. मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा सुरु होईल. तोपर्यंत या भागातील नागरिकांनी संयम बाळगून कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.