अंधकवी चंद्रकांत देशमुखे यांच्या निधनाने व्यथित; राजू शेट्टींकडून आदरांजली

    पुणे/संपत मोरे : लहानपणी अंधत्व आलेल्या पण नंतर अंधत्वावर मात करत कवी म्हणून ख्याती मिळवलेल्या अंधकवी चंद्रकांत देशमुखे यांच्या निधनाने माजी खासदार राजू शेट्टी व्यथित झाले. त्यांनी अंधकवी देशमुखे यांना समाजमाध्यमातून आदरांजली वाहिली आहे. “माझ्या पाठीवर हात ठेवून लढणारा माणूस गेला. जाताना आमच्या लढ्यासाठी कवितेची संपत्ती ठेवून गेला,” असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

    सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील अंधकवी चंद्रकांत देशमुखे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर समाजमाध्यमातून त्यांच्याबद्दल अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    “सहकाराचा झालेला स्वाहाकार, ऊस उत्पादकांच होणार प्रचंड शोषण, साखर सम्राटांची दादागिरी आणि त्यांच्या दबावाखाली दबलेले प्रशासन, साखरसम्राटांकडून ऊस उत्पादकांना होणारा उपद्रव या विषयावर आम्ही जनजागृती करायचो छोट्या मोठ्या सभा, बैठका घेत फिरायचो, गावातले दोन चार तरूण बंडखोर आमच्या हाताला लागायचे. बाकी शेतकऱ्यांची अवस्था पटतय पण साखर सम्राटांच्या विरोधात बोलायच नाही अशी व्हायची. आमची चळवळ मोडून काढण्यासाठी कारखानंदार आणि सरकार हातात हात घालून प्रयत्न करायचे. पण आम्ही मागे हटत नव्हतो. कारण आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळायची चंद्रकांत देशमुखे यांच्या कवितेतून’, असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

    “पेटून उठलो आम्ही तर फुटतील उसाला भाले ! “या कवितेमुळे आमच्या जखमा भरून यायच्या आणि आमच्या बाहूमध्ये स्फुरण यायच आणि पुन्हा नव्या दमाने आंदोलनाची व्यूहरचना करायला लागायचो. दृष्टीने अंध असूनही प्रत्येक आंदोलनामध्ये उत्साहाने सामील व्हायचे. ऊस परिषदेतील शब्द आणि शब्द कानात साठवून ठेवायचे. त्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्हालाही हुरूप यायचा. काही दिवसांपूर्वी आम्ही रणरणत्या उन्हात उसाच्या थकीत एफ आर पी साठी भर उन्हात आत्मक्लेश आंदोलन करत होतो. तशा रणरणत्या उन्हामध्ये वयाची सत्तरी पार केलेले अंध चंद्रकांत देशमुखे माझ्या शेजारी येऊन बसले. त्यांना बघून मी आश्चर्यचकीत झालो.

    ते म्हणाले, “तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढं करताय त्यात माझाही खारीचा वाटू असू द्या.” एका बाजूला कारखानदारांच्या दबावाखाली पिचलेला तगडा शेतकरी घरात बसतो आणि ७० वर्षाचा तरुण माणूस डोळ्याला दिसत नसतानाही आंदोलन करतो, असे हे बाबूजी आज आम्हाला अचानक सोडून गेले पण त्यांच्या कवितेची संपत्ती आम्हाला प्रेरणा देण्यासाठी मागे ठेवून गेले,” असे शेट्टी यांनी म्हटले आहे.