कोरोनाच्या नावाखाली नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष करु नका; वळसे पाटलांच्या सूचना

    मंचर : कोरोनाच्या नावाखाली प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे व छोट्या-मोठ्या कामांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. या बाबी टाळण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी कोरोनाची कामे करताना आठवड्यातील दोन दिवस पूर्ण वेळ आपल्या कार्यालयात बसावे व सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविताना कार्यालयीन कामे व कर्तव्ये पार पाडावीत, अशा सूचना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या.

    मंचर-अवसरी फाटा ता.आंबेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, प्रांतअधिकारी सारंग कोडोलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे आदी उपस्थित होते.

    दिलीप वळसे-पाटील म्हणाले, घोडेगांव ग्रामीण रुग्णालयात सोयीसुविधा वाढविण्यासाठी प्रस्ताव पाठवावेत. कोरोनाची तिसरी लाट थोपवायची असेल तर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवा. कोरोनाचे रुग्ण अधिक सापडलेल्या गावांमध्ये लसीकरणाला प्राधान्य द्यावे. लसीकरण करताना आदिवासी भागाकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या. आंबेगाव तालुक्याप्रमाणे जुन्नर, खेड व शिरुर तालुक्यातील कोरोना रुग्णांना अवसरी खुर्द येथील शिवनेरी जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार देण्यात येत आहेत. त्यामुळे आंबेगावप्रमाणेच जिल्हा परिषद प्रशासनाने जुन्नर, खेड व शिरुर तालुक्यातील आरोग्य कर्मचारी शिवनेरी जम्बो कोविड सेंटरसाठी उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर यांनी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे.

    प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी करा : आयुष प्रसाद 

    प्रत्येक गावात व गावातील प्रत्येक घरात व घरातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी करण्याचे नियोजन करा. ज्या कुटुंबातील एखादा व्यक्ती चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आली. तर त्याच्या संपर्कातील सर्व लोकांची तपासणी करा. जोपर्यंत गाव कोरोनामुक्त होत नाही तोपर्यंत वार्डनुसार कोरोना चाचण्या करा. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना तपासण्या करा. चाचणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या सर्व रुग्णांना सक्तीने कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करा. त्यांच्यावर तात्काळ उपचार करा, अशा सूचना आयुष प्रसाद यांनी केल्या.