पोलिसांच्या परवानगीशिवाय नवीन एटीएम सुरू करू नका; कृष्णप्रकाश यांच्या सूचना

  पिंपरी : पांजरपोळ भोसरी येथील एसबीआयचे एटीएम एका टोळीने फोडून नेले. एटीएमची देखभाल आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी असलेल्या संबंधितांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला आहे. त्यामुळे एटीएमची देखभाल आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी असलेल्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली. पोलिसांच्या परवानगीशिवाय नवीन एटीएम सुरू करू नका, अशा सूचना पोलिसांकडून शहरातील बँकांना देण्यात येणार आहेत.

  पांजरपोळ येथील एसबीआयचे एटीएम फोडून नेणाऱ्या तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २६ लाख ३३ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. एटीएम फोडणाऱ्या टोळीने गुन्हा करण्यापूर्वी भोसरी परिसरातील एटीएमची पाहणी केली होती. त्यामध्ये पांजरपोळ येथील एटीएम मध्ये सायरन, तसेच सुरक्षा रक्षक नसल्याचे त्यांनी हेरले. तसेच हे एटीएम निर्मनुष्य ठिकाणी असल्याने त्यांनी हे एटीएम फोडण्याचा निर्णय घेतला. १० जून रोजी मध्यरात्री चोरट्यांनी हे एटीएम फोडून नेले. यामध्ये चोरट्यांनी पैशांच्या चार ट्रे सह २२ लाख ९५ हजार ६०० रुपयांची रोकड चोरून नेली.

  ना सायरन वाजला, ना कोणी सुरक्षारक्षक नेमला

  हा प्रकार घडल्यानंतर एटीएममधील सायरन वाजला नाही. तसेच एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नेमला नाही. हा संबंधितांचा हलगर्जीपणा आहे. त्यामुळे हा प्रकार घडला असल्याने एटीएमच्या तांत्रिक बाबी आणि सुरक्षा व्यवस्था पुरवणाऱ्या संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. एटीएम फोडीच्या या गुन्ह्यात संबंधितांना सहआरोपी करणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. तसेच बँकांनी नवीन एटीएम सुरू करण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी. सुरक्षेचे मापदंड पाळून एटीएम सुरू करावे. एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चित कारावी आणि त्याबाबत सजग राहावे.

  रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांकडून लक्ष

  एटीएममध्ये सायरन आणि अन्य तांत्रिक बाबींचा समावेश करावा. ते चालू स्थितीत असल्याचे वारंवार तपासायला हवे. पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालताना देखील एटीएमवर लक्ष ठेवतात. चिखली येथे पोलिसांनी रात्री लक्ष ठेवल्यामुळे एक एटीएम फोडीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे बँकांनी पोलिसांना एटीएमची माहिती तर घ्यावीच परंतु नवीन एटीएम सुरू करताना पोलिसांची परवानगी अवश्य घ्यावी. एटीएमची देखभाल आणि सुरक्षेसाठी बँकांकडून एखाद्या संस्थेची नेमणूक करण्यात येते. मात्र, संबंधितांच्या हलगर्जीपणामुळे एटीएम फोडण्याच्या घटना घडतात.