खळबळजनक ! पुण्यात डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या; वानवडीतील घटना

    पुणे : डॉक्टर्स दिन आज सगळीकडे साजरा होत असतानाच वानवडीतील आझाद नगर येथे एक खळबळजनक घटना घडली. एका डॉक्टर दाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. डॉ. अंकिता निखिल शेंडकर (वय २६) आणि निखिल दत्तात्रय शेंडकर (वय २८) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेने पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

    डॉ. अंकिता आणि डॉ. निखिल हे दोघेही आझाद नगर येथे राहत होते. आझाद नगर येथील गल्ली नंबर २ या ठिकाणी अंकिता यांचे क्लिनिक आहे. तर निखिल अन्य ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. अंकिता आणि निखिल या दोघांमध्ये काल रात्री फोनवर वाद झाला. मात्र, जेव्हा निखिल घरी परतले तेव्हा त्यांना अंकिताने गळफास घेतल्याचे समजले. पत्नी अंकिताने हे टोकाचे पाऊल उचलल्याने निखिल यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनीही बुधवारी सातच्या सुमारास गळफास घेत जीवनयात्रा संपवली.

    दरम्यान, या घटनेची माहिती वानवडी पोलिसांना देण्यात आली. याची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी धाव घेतली. या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. ही आत्महत्या क्षुल्लक कारणावरून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास वानवडी पोलिस करत आहेत.