कोरोनाच्या आडून गावचे राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका

भिमाशंकर : जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे प्रत्येक गावात नेमलेल्या ग्रामस्तरीय समितीने काटेकोर पालन केले पाहिजे. कोणत्याही प्रकारचा परस्पर निर्णय घेऊ नका. गावातील लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या.

 प्रांत अधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आवाहन

भिमाशंकर : जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे प्रत्येक गावात नेमलेल्या ग्रामस्तरीय समितीने काटेकोर पालन केले पाहिजे. कोणत्याही प्रकारचा परस्पर निर्णय घेऊ नका. गावातील लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. तसेच विरोधी गटातील लोकांना त्रास देण्याच्या हेतूने काही निर्णय घेऊ नका. कोरोनाच्या आडून गावचे राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन प्रांत अधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.    
मुंबई, पुणे व इतर शहरांमधून येण्यासाठी सरसकट पास मिळू लागल्याने लोक गावांमध्ये आले. यातूनच कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण निघू लागले. त्यामुळे आलेल्या लोकांनी सक्तीने घरात गृह विलगीकरण करून राहणे आवश्यक आहे. मात्र हे गावात आलेले लोक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली गावांमध्ये फिरताना दिसतात. त्यामुळे गावातील लोकांना धोका वाढला आहे. अनेक वेळा सांगूनही हे लोक एैकत नाहीत. त्यामुळे अशांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. गावात कोणी फिरताना आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल.  
मुंबईकरांनी आपल्या जिवाशी तसेच गावातील बांधवांच्या जिवाशी खेळू नये. तीन आठवडे घरात बसून काढल्यास मुंबईकर आपल्या बरोबर आपल्या गावाचा जिव वाचवणार आहेत. ज्या गावाने आपल्याला स्विकारले आहे त्यांच्या जिवाशी खेळू नका. कुठल्याही प्रकारचे साहित्य लागल्यास ग्रामस्तरीय समिती, गावातील सरकारी कर्मचारी यांना सांगा. तसेच कुठलाही त्रास जाणवू लागल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा वर्कस्, आरोग्य सेवक, तलाठी, ग्रामसेवक यांपैकी कोणालाही कळवा, त्यांची पुढील काळजी घेण्यासाठी तालुका प्रशासन तत्पर आहे, असे प्रांत अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.