जास्त आगाऊपणा करू नका, जेवढी स्क्रिप्ट दिली, तेवढंच बोला; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची अमोल कोल्हेंवर टीका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं आहे. यावरून शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर सडकून टीकास्त्र सोडलं आहे.

    पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं आहे. यावरून शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर सडकून टीकास्त्र सोडलं आहे.

    नेमकं काय म्हणाले आढळराव पाटील?

    तुमच्या नेत्यांना जी मंत्रीपद मिळाली, ती शिवसेनेमुळंच मिळाली आहेत असं मी सुद्धा म्हणू शकतो. पण माझा मुजोरपणा नाही. कारण शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या संगनमताने हे सरकार चाललेलं आहे. तेव्हा तुम्ही जास्त आगाऊपणा करू नका. जेवढी स्क्रिप्ट दिली, तेवढंच बोला, अशी घणाघाती टीका आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर केली आहे. भांडणं आमच्या दोघांची आहेत. यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे कुठून आले. माझं अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील या राष्ट्रवादी नेत्यांशी चांगलं जुळतं. पण हे दोघे हवेत आहेत. ह्यांना वाटतंय राज्य सरकार ह्यांच्यामुळं चालतंय. अमोल कोल्हेंनी हे विसरू नये की त्यांना प्रकाश झोतात आणण्यात केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हात आहे, असंही आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.

    तसेचं, डॉ. अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली बहुतेक, तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात, तसंच अमोल कोल्हे यांचे आज झालं, आपण ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले, असं म्हणत शिवसेना नेते आणि प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी अमोल कोल्हेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.