डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींवर आरोप निश्चित

पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्याला आता ८ वर्ष पुर्ण होत आहेत. त्यानंतर यातील आरोपींवर आरोप निश्चित झाले आहेत.

    पुणे :  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर न्यायालयाने आरोपी निश्चित केले आहेत. डॉ. विरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर हे आरोपी निश्चित केले आहेत. परंतु, आरोपींना गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयाला त्यांनी सांगितले. ३० सप्टेंबर रोजी सरकार व बचाव पक्षातर्फे पुराव्यासंबंधीची कागदपत्रे सादर केली जाणार आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयापुढे ही सुनावणी झाली.

    पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्याला आता ८ वर्ष पुर्ण होत आहेत. त्यानंतर यातील आरोपींवर आरोप निश्चित झाले आहेत.

    दरम्यान, कोरोनाचे कारण सांगत वकील व नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी आरोप निश्चितीस पुन्हा मुदत देण्याची विनंती आरोपींनी न्यायालयाला केली होती. त्यावर न्यायालयाने मुदतवाढ देण्यास नकार दिला. तसेच, आरोप निश्चिती झाली आहे. गुन्हा कबूल आहे की नाही, अशी विचारणा केली. त्यावर गुन्हा कबूल नसल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. याप्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे, विरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर होते, तर संजीव पुनाळेकर व विक्रम भावे प्रत्यक्ष उपस्थित होते. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्याविरोधात आरोपींवर कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर पुरावे नष्ट करणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत.सीबीआय तर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी आणि बचाव पक्षातर्फे वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी कामकाज पाहिले.