डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयने सादर केले तेरा पुरावे

सीबीआयने सादर केलेल्या कागदपत्रांपैकी कोणती कागदपत्रे मान्य आहेत, हे बचाव पक्षातर्फे पुढील सुनावणीत सांगितले जाणार आहे. त्यानंतर सरकार पक्षातर्फे साक्षीदारांची यादी (लिस्ट ऑफ विटनेस) सादर केली जाणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली.या सुनावणीला डॉ. तावडे आणि न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आरोपी सचिन अंदुरे हे दोघे येरवडा मध्यवर्ती कारागृहातून, तर आरोपी शरद कळसकर मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते.

    पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने आज न्यायालयात घटनास्थळाचा पंचनामा, मृत्यूची कारणे, मृत्यूची वैद्यकीय सूचना, फॉरेन्सिक प्रयोगशाळांचे अहवाल, आरोपी संजीव पुनाळेकर यांच्या कार्यालयातून दोन लॅपटॉप जप्त केल्याचा आणि आरोपींच्या छायाचित्रांचा मेमो यासह तेरा पुरावे सादर केले.

    गुन्ह्यात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर ही आरोप निश्चित केले आहेत. मात्र या आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितले. त्यामुळे सरकार व बचाव पक्षातर्फे पुराव्यासंबंधीची कागदपत्रे सादर केली जाणार होती. त्यानुसार हे पुरावे सादर करण्यात आले.

    सीबीआयने सादर केलेल्या कागदपत्रांपैकी कोणती कागदपत्रे मान्य आहेत, हे बचाव पक्षातर्फे पुढील सुनावणीत सांगितले जाणार आहे. त्यानंतर सरकार पक्षातर्फे साक्षीदारांची यादी (लिस्ट ऑफ विटनेस) सादर केली जाणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली.
    या सुनावणीला डॉ. तावडे आणि न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आरोपी सचिन अंदुरे हे दोघे येरवडा मध्यवर्ती कारागृहातून, तर आरोपी शरद कळसकर मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. जामिनावर असलेले आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे प्रत्यक्ष हजर होते. आरोपी कळसकर याला ताबडतोब येरवडा कारागृहात हलविण्याचे आदेश न्यायालयाने आर्थर रोड कारागृह प्रशासनाला दिले. आरोपींच्या वतीने अॅड. प्रकाश साळसिंगीकर यांनी बाजू मांडली. या प्रकरणाची पुढील सहा ऑक्टोबर रोजी होणार आहे. गुन्हेगारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २९४ नुसार, खटल्याशी संबंधित कागदपत्रांची यादी सीबीआयने विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान हे पुरावे सादर केले आहेत.