वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे यंदाही संत तुकाराम महाराज बीज सोहळा रद्द

गतवर्षी देहू परिसरात पहिला कोविडचा रुग्ण आढळला होता. यंदाही देहूगाव मध्ये सहा सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आली असून सध्या गावात कोविडचे सकारात्मक ३२ रुग्ण असून १७ जण गृहविलगीकरणात आहेत. जर बीज सोहळा संपन्न झाला तर येणारे यात्रेकरू दर्शन घेताना आजुबाजुला स्पर्श करणार, शिंकणार, खोकणार यामध्ये जर कोणी सकारात्मक रुग्ण असतील तर यामुळे कोरोनाचा राज्यभर प्रसार झपाट्याने होऊ शकतो यासाठी हा सोहळा रद्द करण्यात यावा असे मत डॉ. किशोर यादव यांनी व्यक्त केले. यावर उपस्थितांचे एकमत झाले.

     

    देहूगाव : पुण्यासह पिंपरी चिंचवड व तीर्थक्षेत्र देहूनगरी मध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता तुकाराम बीज सोहळ्याचे नियोजन करण्यासंदर्भात ही आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय कोणताही निर्णय संस्थानला घेता येत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बीजोत्सवाचा कार्यक्रम निश्चित करता येणार आहे. यंदा बीजोत्सव होणार आहे किंवा नाही याबाबत राज्यभरातील दिंड्या व फडकरी संस्थानकडे वारंवार चौकशी करत आहेत. म्हणून याबाबत निर्णय होणे अपेक्षित असल्याने ही बैठक आयोजित केली होती. शासन ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणेच संस्थान बीजोत्सव सोहळ्याचे आयोजन करणार आहे. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आल्यानंतर हा सोहळ्याच्या आयोजनाबाबतचा निर्णय होणार आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सकारात्मक भूमिका घेत संमती दर्शविली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी दिली.

    गतवर्षी देहू परिसरात पहिला कोविडचा रुग्ण आढळला होता. यंदाही देहूगाव मध्ये सहा सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आली असून सध्या गावात कोविडचे सकारात्मक ३२ रुग्ण असून १७ जण गृहविलगीकरणात आहेत. जर बीज सोहळा संपन्न झाला तर येणारे यात्रेकरू दर्शन घेताना आजुबाजुला स्पर्श करणार, शिंकणार, खोकणार यामध्ये जर कोणी सकारात्मक रुग्ण असतील तर यामुळे कोरोनाचा राज्यभर प्रसार झपाट्याने होऊ शकतो यासाठी हा सोहळा रद्द करण्यात यावा असे मत डॉ. किशोर यादव यांनी व्यक्त केले. यावर उपस्थितांचे एकमत झाले.

    श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सोहळ्याची तयारी कशा प्रकारे झाली आहे, याचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर प्रशासक बर्गे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना तुकाराम बीज यात्रा रद्द करण्या संदर्भात प्रस्ताव सादर केला. त्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी बारवकर यांनी दिली. यावेळी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येणार असून सर्व भाविकांनी आपआपल्या गावातच बीजोत्सव साजरा करावा असे अवाहन प्रशासनाच्या व संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

    या बैठकीला पिंपरी चिंचवडच्या अप्पर तहसिलदार गीता गायकवाड, देहूगाव नगरपंचायतीचे प्रशासक व मावळचे तहसिलदार मधुसुधन बर्गे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विलास सोंडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, मंडलाधिकारी शेखर शिंदे, तलाठी अतुल गीते, पोलीस पाटील सुभाष चव्हाण, चंद्रसेन टिळेकर आदी उपस्थित होते.