‘तुझा मास्क कुठंय? नाहीतर शेजारच्याला…’; वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनची अजित पवारांनी केली कानउघाडणी

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हनुवटीच्या खाली मास्क घेणाऱ्या कॅमेरामनची चांगलीच कानउघाडणी केली.तुझा मास्क कुठंय?अशी विचारणा करत शेजारच्याला कोरोना व्हायचा, उचलायला सांगू का पोलिसांना? अशी मिश्कली केली. सहकार व पणन मंडळाच्या बारामती येथील शनिवार (दि. २८) कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार यांनी कलेली ही मिश्कीली सर्वत्र चर्चेची ठरली आहे.

    या कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत अजुनही काळजी घेणे गरजेचे आहे. तिस-या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लसीकरणचा वेग वाढवला जात आहे. लवकरात लवकर लसीकरण व्हावे यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे. त्यासाठी मार्गदर्शक सुचनांचे पालन करा, असे सांगितले. नेमके याचवेळी एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनचा मास्क हनुवटीवर असल्याचे पवार यांच्या लक्षात आले.

    ‘अरे मी काय सांगतो. तुझा मास्क कुठंय. तुझ्यामुळे शेजारी असणा-याला कोरोना व्हायचा. उचलायला सांगू का पोलिसांना’ अशा शब्दात कानउघाडणी केली. यावर कार्यक्रमस्थळी चांगलाच हशा देखील पिकला.