जन आशीर्वाद यात्रेच्या गर्दीवरुन अजित पवार संतप्त; म्हणाले…

देशभरात एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत असतानाच महाराष्ट्र आणि केरळात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येने चिंता वाढली आहे. वाढता पॉझिटिव्हिटी दर, सक्रीय रुग्ण यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

    पुणे : देशभरात एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत असतानाच महाराष्ट्र आणि केरळात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येने चिंता वाढली आहे. वाढता पॉझिटिव्हिटी दर, सक्रीय रुग्ण यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. अचानक वाढणाऱ्या या संख्येमुळे गृहमंत्रालयही चिंतेत आहे. याबाबत गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. आता, या पत्रानंतर राज्यातील जनआशीर्वाद यात्रेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्र सरकारचे कान टोचले आहेत.

    गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, प्रशासनाने ज्या जिल्ह्यात कोरोना संक्रमित पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. त्यात प्रो एक्टिव कन्टेंन्मेंटसाठी पाऊल उचलावीत. संक्रमण कमी करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. उत्सव, सणांचे दिवस लक्षात घेता गर्दी होण्यापासून आळा घालावा. लोकांची गर्दी रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्ती करा असंही त्यांनी म्हटलं आहे. या पत्राबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी, केंद्राने केंद्राचं काम केलंय, आता महाराष्ट्राने आपलं काम करायचंय. केंद्राला काळजी वाटली म्हणून त्यांनी पत्र पाठवलं. आपणही नियम पाळले पाहिजेत, गर्दी टाळली पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यासोबतच, भाजपवर निशाणाही साधला.

    आपल्याकडे केरळमध्ये सर्वाधिक कोरोना वाढत आहे. दुसऱ्या लाटेत देशपातळीवर महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्णसंख्या महाराष्ट्रात होती. त्यामुळे, केंद्राने आपल्याला सल्ला दिला आहे. मात्र, दुसरीकडे नवीन 4 मंत्र्यांना कसल्या यात्रा काढायला सांगतात. आगामी काही दिवसांतच या यात्रेच्या ठिकाणी कोरोनाचा फटका बसलेला दिसेल, अर्थात तिथे कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये या मताचे आम्ही आहोत. पण, उद्या रुग्ण वाढले तर कोण जबाबदार? याचाही विचार केंद्राने करावा, असेही पवार यांनी म्हटले.