सण-समारंभाबाबत अजित पवार म्हणाले; कोरोनाचा प्रादुर्भाव…

बारामती परिसरातील विकासकामांची पाहणी करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा घेतला.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुढे येणारे सण, उत्सव समारंभ साधेपणाने गर्दी न करता साजरे करावेत तसेच कोरोना बाधीतांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनामध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिल्या. तसेच बारामती परिसरात सुरु असणारी विकासकामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

    बारामती परिसरातील विकासकामांच्या पहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर या मान्यवरांसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

    अजित पवार म्हणाले , सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सण समारंभ गर्दी न करता साजरे करावेत. कोरोना बाधींतांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनामध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन बारामती शहरात तसेच ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. बारामती तालुक्यात कोविड लसीकरणाबाबत समाधान व्यक्त करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सामाजिक दायित्वातून क्रांतीदेवी बजात ट्रस्टने पुणे जिल्ह्यासाठी दिड लाख लस दिली हे काम खरोखरच कौतुकस्पद आहे. स्वयंसेवा स्ंस्थाचे अशा प्रकारचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

    या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कन्हेरी येथील फळरोपवाटीका व वन उद्यान, देसाई इस्टेट आणि क्रिडा संकुल येथील कॅनलवरील सुशोभिकरण इत्यादी कामांची पाहणी करुन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना दिल्या. सर्वच विभागांनी विकासकामे समन्वयाने पार पाडावीत. निधीचा पुरेपूर वापर करावा. विकास कामे दर्जेदार झाली पाहीजेत. निधीची मागणी असल्यास प्रस्ताव सादर करावेत. सर्वानीच जबाबदारी स्वीकारून कामे करणे आवश्यक आहे, असे निर्देश त्यांनी कोरोना आढावा बैठकीनंतर दिले.

    परिवहन आयुक्त कार्यालयातून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती साठी मिळालेल्या नवीन इंटरसेप्टर वाहनाचे पूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशार पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, मोटार वाहन निरीक्षक चंद्रमोहन साळोखे व नंदकिशोर काळे व इतर अधिकारी उपस्थित होते. या वाहनामध्ये स्पीड गन, ब्रीथ ॲनालायझर व टील्ट मीटर बसवीले आहेत. त्यामुळे रोडवरील जादा स्पीडची वाहने तसेच नशा करुन चालवणारी वाहणे पकडण्यास मदत होणार आहे.