पुणे शहरासह जिल्ह्यावर वरचष्मा राखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून प्रयत्न

गेली दहा वर्षांपूर्वी पुणे व पिंपरी-चिंचवड या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. जिल्ह्याच्या राजकारणावरही राष्ट्रवादीचाच वरचष्मा कायम होता. पु

  बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यामध्ये आपला वरचष्मा पुन्हा निर्माण करण्यासाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इंदापूर तालुक्यातील माजी सहकारमंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीने (NCP) माघार घेतल्याने अजित पवार व हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यामध्ये अप्रत्यक्षरीत्या दिलजमाई झाली असून, जिल्हा बँक व व छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत याचा फायदा राष्ट्रवादी उठवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

  गेली दहा वर्षांपूर्वी पुणे व पिंपरी-चिंचवड या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. जिल्ह्याच्या राजकारणावरही राष्ट्रवादीचाच वरचष्मा कायम होता. पुणे शहर व जिल्ह्याच्या राजकारणावर “सब कुछ अजितदादा” असे चित्र होते. मात्र, यानंतर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा पुणे शहर व जिल्ह्याचा बुरुड कमकुवत करण्यासाठी विशेष लक्ष दिले. परिणामी, पुणे व पिंपरी-चिंचवडची सत्ता भाजपने काबीज करून अजित पवार यांच्या वर्चस्वाला छेद दिला.

  यानंतर २०१४ मध्ये झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप व मित्र पक्षांचे सरकार सत्तेवर आले. तेव्हापासून कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीच्या विशेषतः अजित पवार यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या पुणे जिल्ह्यावर भाजपने अधिकचे लक्ष दिले. चक्क बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यावर लक्ष घातले. याचा परिणाम बारामती लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य कमालीचे घटून विरोधी उमेदवार असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना लक्षणीय मते मिळाली. तेव्हापासून राष्ट्रवादीने जिल्ह्याच्या राजकारणात अलर्ट राहत प्रत्येक मतदारसंघात विशेष लक्ष घातले. त्याचा परिणाम २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीसाठी अनुकूल दिसला.

  २०१९ च्या बारामती लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपने उमेदवारी दिली. मात्र, या निवडणुकीत भाजपची खेळी सपशेल फेल ‌ठरली. विधानसभा निवडणुकीतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देऊन जातीय समीकरणांचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवार यांच्या राजकीय झंजावाता पुढे पडळकर यांचा निभाव न लागता चक्क त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. सत्ता ताब्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील राजकारणावर आपली मजबूत पकड निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

  तोंडावर आलेल्या पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी गटातील नगरसेवक आपल्याकडे खेचण्यासाठी व्यूहरचना सुरू केली आहे. जिल्ह्यातील विरोधी नेत्यांनाही आपल्याकडे आणण्यासाठी मध्यस्थीमार्फत प्रयत्न सुरु केले असल्याची चर्चा आहे. राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्याशी दिलजमाई करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्री छत्रपती साखर कारखान्याच्या कारभारात सक्रिय केले आहे. या कारखान्याची निवडणूक काही दिवसातच लागणार आहे. त्यामुळे जाचक यांना बरोबर घेऊन छत्रपती कारखान्यामध्ये आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही बेरजेची खेळी आहे.

  इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीतून राष्ट्रवादीने माघार घेतली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी सभासदांच्या हितासाठी राष्ट्रवादी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमागे आगामी इतर निवडणुकांची बेरजेची गणिते असल्याचे स्पष्ट होत आहे.

  पुणे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रयत्नशील आहेत. या निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील यांचे जवळचे सहकारी व जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी या निवडणुकीसाठी चांगलीच मोट बांधली आहे. मात्र कर्मयोगीतून रष्ट्रवादीने माघार घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये अप्रत्यक्षरीत्या दिलजमाई झाल्याचे स्पष्ट झाले आहे, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील उपमुख्यमंत्री अजितदादांना साथ देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादांच्या वर्चस्वाला खाली असलेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही हर्षवर्धन पाटील लक्ष घालणार नसल्याचे संकेत राष्ट्रवादीच्या भूमिकेवरून स्पष्ट झाले आहे.

  दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील यांना भाजपने पक्षात घेतल्याने राज्यात खळबळ उडाली होती. सलग तीन ‌वेळा मंत्री असलेले हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपला मोठे बळ मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील सहकारी संस्थांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यासाठी विरोधकांशी अंतर्गत हातमिळवणी सुरू केली आहे, मात्र राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार व पदाधिकारी दुखवणार नाहीत, याची विशेष काळजी देखील उपमुख्यमंत्री घेत असल्याचे बोलले जात आहे.

  एकंदरीत शहर व जिल्ह्याच्या राजकारणावर दहा वर्षांपूर्वीचे ‘सबकुछ अजितदादा’ हे चित्र निर्माण करण्यास उपमुख्यमंत्री अजितदादा यशस्वी ‌ठरणार का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.