संपादक आणि गुणवंत लेखक आनंद अंतरकर यांचे निधन

ज्येष्ठ लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले आनंद अंतरकर यांचं आज दुपारी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं आहे.

    पुणे : हंस, मोहिनी आणि नवल या दिवाळी अंकांचे संपादक आणि ज्येष्ठ लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले आनंद अंतरकर यांचं आज दुपारी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं आहे. ते ८० वर्षांचे होते. सुमारे महिन्यापूर्वी त्यांच्यावर पोटाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
    रुग्णशय्येवरूनही ते शेवटच्या क्षणापर्यंत दिवाळी अंकांची कामे निष्ठेने आणि जिद्दीने करत होते. हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वीच आनंद अंतरकरांनी यंदाच्या दिवाळी अंकांचे काम बऱ्याच प्रमाणात पूर्ण केले होते. त्यांच्या पश्चात् त्यांची पत्नी प्रियदर्शिनी (ग. दि. माडगूळकर यांची कन्या ),पुत्र अभिराम, कन्या मानसी आणि जावई सुप्रसिद्ध अभिनेते पंकज विष्णू आहेत.
    सुप्रसिद्ध सिनेपत्रकार अरुणा अंतरकर, लेखिका अनुराधा औरंगाबादकर आणि चित्रपटकार हेमलता अंतरकर ह्या त्यांच्या भगिनी होत. ७५ वर्षांच्या परंपरेनुसार तिन्ही नियतकालिकांचे ह्या वर्षीचे दिवाळी अंकसुद्धा वाचकांपर्यंत पोहचणार आहेत, अशी ग्वाही अभिराम अंतरकर ह्यांनी दिली.
    अंतरकर यांच्या निधनामुळे उत्तम सजावट, अनुभवी व नवोदित लेखकांच्या कसदार साहित्याने नटलेल्या मुद्रित मराठी नियतकालिकांचे एक अनोखे पर्व संपुष्टात आल्याची भावना व्यक्त होत आहे.