सोमवार ठरला ‘अपघातवार’ ; एकाच रात्री तीन अपघात ८ जणांचा मृत्यू

पुणे : पुणे -सोलापूर रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. कंटेनरने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणारी सेंट्रो कार कंटेनरला धडकली. या अपघातात पुण्यातील ५ जण जागीच ठार झाले आहे.यवतजवळ पहाटे ३ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात ठार झालेल्या पुण्यातील ५ जणांत  ४ जण कोंढवा येथील आहेत. तर १ जण हडपसर भागातील रहिवासी आहे.

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर रात्री झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातांत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. तर तीन ते चार जण गंभीर जखमी आहेत. चालकांची बेफिकिरी पाऊस आणि खड्ड्यांमुळे हे अपघात झाले. वाखारी (ता. दौंड) येथील समाधान हॉटेल समोर महामार्गावर पायी चालणाऱ्या एका युवकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर कासुर्डी (ता. दौंड) येथील शेरू ढाबा येथे एका कंटेनर चालकाने रस्त्यातच कंटेनर थांबवल्याने त्यास एका कारची मागून धडक बसली. यात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला.
तिसरा अपघात सहजपूर (ता. दौंड) गावच्या हद्दीत झाला. येथे रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यात गॅस वाहून नेणाऱ्या कंटेनरचे पुढील चाक अडकले, यामुळे चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला. त्यामुळे हा कंटेनर दुभाजक ओलांडून विरूद्ध दिशेकडील रस्त्यावर गेल्याने दोन कार त्याला धडकल्या. या अपघातात एकाचा जागेवरच तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झला. रात्रीच्या सुमारास झालेल्या या तीनही अपघातांची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली. येथे पावसाचा जोरही अधिक असल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती