शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील आठ जण तडीपार

शिक्रापूर : शिक्रापूर (ता.शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळे गंभीर गुन्हे करून दहशत माजविणाऱ्या आठ युवकांच्या टोळीला शिक्रापूर पोलिसांच्या पाठपुराव्या नुसार तीन महिन्यासाठी पुणे जिल्ह्यातील काही

शिक्रापूर : शिक्रापूर (ता.शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळे गंभीर गुन्हे करून दहशत माजविणाऱ्या आठ युवकांच्या टोळीला शिक्रापूर पोलिसांच्या पाठपुराव्या नुसार तीन महिन्यासाठी पुणे जिल्ह्यातील काही भागातून तडीपार करण्यात आले असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन परिसरात औद्योगिक वसाहत असल्यामुळे या भागामध्ये गर्दी, मारामारी यांसह आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार घडत असताना, या परिसरामध्ये गुन्हेगारांच्या काही टोळ्या निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे सदर टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी प्रयत्न सुरु केले असताना परिसरात गर्दी, मारामारी खुनाचा प्रयत्न, दहशत निर्माण करणे, अपहरण, सरकारी नोकरास मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे करणाऱ्यांची यादी तयार करून पोलीस अधीक्षक कार्यालय कडे तडीपार संदर्भातील मंजुरीसाठी पाठवली होती. पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे यांच्याकडून नुकतेच मंजुरी प्राप्त झाली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील अनिकेत रामदास गायकवाड वय २५ वर्षे रा. इकोग्राम शिक्रापूर (ता. शिरूर) जि. पुणे मूळ रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) जि. पुणे, प्रतिक किरण केवटे वय १९ वर्षे रा. चाकणरोड शिक्रापूर (ता. शिरूर) जि. पुणे, अभिषेक अंकुश नाईकनवरे वय २३ वर्षे रा. पिंपळे जगताप ता. शिरूर जि. पुणे, भानुदास उर्फ आण्णा सुरेश जाधव वय २० वर्षे रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) जि. पुणे, पवन श्रीरंग जगताप वय २५ वर्षे रा. पिंपळे जगताप (ता. शिरूर) जि. पुणे, रुपेश राजू वैराग वय २३ वर्षे रा. पिंपळे जगताप (ता. शिरूर) जि. पुणे, निखील सावकार शेळके वय २३ वर्षे रा. रा. पिंपळे जगताप (ता. शिरूर) जि. पुणे, सतीश भगवान जाधव वय २२ वर्षे रा. पिंपळे जगताप (ता. शिरूर) जि. पुणे या तिघांना शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतून शिरूर, दौंड, हवेली या तीन तालुक्यांसह पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतून तीन महिन्याकरता तडीपार करण्यात आले. सदर व्यक्ती पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आढळून आल्यास शिक्रापूर पोलिसांना माहिती देण्याचे आव्हान देखील शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे.

औद्योगिक वसाहत भागातील गुन्हेगारांमध्ये घबराट

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असल्यामुळे येथे जमिनीला मोठा भाव आला आहे. येथे कंपनीतील ठेक्यातून तसेच जागेच्या वादातून अनेक मोठमोठे वाद झालेले असून त्यामध्ये काहींवर अनेक गुन्हे दाखल झालेले असल्यामुळे शिक्रापूर पोलिसांनी अचानक आठ जणांना तडीपार केल्यामुळे औद्योगिक वसाहत भागातील गुन्हेगारांमध्ये घबराट पसरली आहे.