उपमहापौरपदासाठी २३ मार्चला निवडणूक; विभागीय आयुक्तांनी दिली माहिती

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी उपमहापौरपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १९ मार्च रोजी तीन ते पाच या वेळेत निवडणुकीसाठी अर्ज भरता येणार आहेत. २३ मार्च रोजी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. 

    पिंपरी: पिंपरी – चिंचवडच्या उपमहापौरपदासाठी २३ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी १९ मार्चला दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज भरता येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी दिली. केशव घोळवे यांना अवघ्या चार महिन्यात उपमहापौरपदाचा राजीनामा द्यावा लागला. घोळवे यांनी ५ मार्च रोजी महापौर उषा ढोरे यांच्याकडे राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे उपमहापौरपद रिक्त झाले आहे.

    पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी उपमहापौरपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १९ मार्च रोजी तीन ते पाच या वेळेत निवडणुकीसाठी अर्ज भरता येणार आहेत. २३ मार्च रोजी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता विशेष सभा होणार आहे. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

    महापालिकेत भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे भाजपचा उपमहापौर होणार हे निश्चित आहे. आगामी निवडणुकीला जेमतेम दहा महिन्यांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उपमहापौरपदी कोणाला संधी दिले जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, मागीलवेळी मोक्याच्या क्षणी नाव मागे पडलेल्या वसंत बोराटे यांचे नाव उपमहापौरपदासाठी निश्चित असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.