Elgar conference will not be held in Pune on December 31; Police denied permission

एल्गार परिषदेच्या आयोजकांनी ३१ डिसेंबरला कार्यक्रम करण्याची परवानगी पुणे पोलिसांकडे मागितली होती. त्यासंदर्भातील पत्रही पोलिसांना देण्यात आले होते. एल्गार परिषदेचे आयोजक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांनी हे परवानगी पत्र पोलिसांना दिले होते. सरकारने परवानगी नाकारल्यास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही जाऊ अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती.

पुणे : ३१ डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषद भरणार नाही. पुणे शहर पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी नाकारली आहे. कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ही परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते.

एल्गार परिषदेच्या आयोजकांनी ३१ डिसेंबरला कार्यक्रम करण्याची परवानगी पुणे पोलिसांकडे मागितली होती. त्यासंदर्भातील पत्रही पोलिसांना देण्यात आले होते. एल्गार परिषदेचे आयोजक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांनी हे परवानगी पत्र पोलिसांना दिले होते. सरकारने परवानगी नाकारल्यास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही जाऊ अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती.

दरवर्षी १ जानेवारीला एल्गार परिषदचे आयोजन केले जाते. यंदा मात्र, ३१ डिसेंबरला ही परीषद घेतली जाणार आहे.  हा कार्यक्रम सांस्कृतिक असतो. या कार्यक्रमासाठी आंबेडकरवादी, लोकशाहीवादी अशा विविध संघटना देशभरातून येतात. याठिकाणी प्रबोधनात्मक भाषणं होतात. आर्थिक आणि सामाजिक विषमतेविरोधात संघटना आपल्या भूमिका मांडत असे कोळसे पाटील यांनी म्हंटले होते.

दरम्यान, भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमासंदर्भात राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरवर्षी हजारो अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे एकत्र येतात. पण यंदा अनुयायांना गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. खाद्यपदार्थ, पुस्तकांचे स्टॉल्स आणि जाहीर सभा घेण्यावरही बंदी आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या कार्यक्रमाचे प्रसारण १ जानेवारीला दिवसभर दूरदर्शन आणि समाज माध्यमांवर केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावे असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.